रस्त्यातच अडविली वाहने
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमध्ये जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या जवळपास २५० आंदोलक शेतकऱ्यांना येवला पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले आहे. दरम्यान नांदूर मधमेश्वर कालव्यात पाणी सोडण्याच्या मागणीवरून आंदोलन चांगलेच चिघळले आहे. येवला पोलिसांनी शेतकऱ्यांना अडविले असले तरी काही शेतकरी गुंगारा देऊन निफाडच्या पिकअप वेअरमध्ये पोहचले आहे.
वैजापूरच्या शेतकऱ्यांना येवला पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. |
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर - गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात यावे. या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून येथील नांदूर मधमेश्वर पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांसह महिलांनी हंडा मोर्चाही काढला होता. याशिवाय तालुक्यातील वक्ती येथी नांदूर मधमेश्वर कालव्यात उतरून बादली आंदोलनही करण्यात आले होते. परंतु आवर्तन सोडण्यात न आल्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला.
या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी शनिवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जवळपास येथून वेगवेगळ्या वाहनांमध्ये २५० शेतकरी निफाडला जाण्यासाठी निघाले खरे. परंतु येवला पोलिसांनी ही वाहने अडवून शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. काही शेतकऱ्यांनी पोलिसांना गुंगारा देऊन पिकअप गाठून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळताच आमदार रमेश बोरनारे यांनी येवला गाठून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांनी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी वैजापूर येथे झालेल्या सभेत नांदूर मधमेश्वर कालव्यात आवर्तन सोडण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचे सांगितले खरे. परंतु अद्याप आवर्तन सोडण्यात आले नाही. ऐन लोकसभा निवडणूक व नांमकाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे प्रशासन चांगलेच पेचात सापडले आहे.