मतदान प्रक्रिया शांततेत
लोकसभा निवडणुकीसाठी वैजापूर विधानसभा मतदारसंघात सरासरी ६५ टक्के मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५६.२९ टक्के मतदान झाले होते. सरासरी ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत ही आकडेवारी जाण्याची शक्यता आहे. दरम्यान दुपारी चार वाजेनंतर बहुतांश मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याने शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर अचानक गर्दी झाली होती. त्यामुळे शहरातील तब्बल २५ मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.
वैजापूर येथील मतदान केंद्रावर अशी रांग लागली होती. |
लोकसभा निवडणुकीसाठी वैजापूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३३८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. वैजापूर विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख १० हजार १७ मतदार असून यामध्ये एक लाख ६२ हजार ३४६ पुरूष तर एक लाख ४७ हजार ६६९ स्ञी मतदारांचा समावेश आहे. सकाळच्या सुमारास मतदान प्रक्रिया सुरू होताच शहरासह ग्रामीण भागात मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. त्यामुळे मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या.
वैजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या केंद्रावरही गर्दी झाली होती. |
दुपारच्या सुमारास मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. परंतु दुपारी चार वाजेनंतर पुन्हा शहरासह ग्रामीण भागातील विविध मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच रांगा दिसून आल्या. सकाळपासून ते दुपारच्या सत्रापर्यंत मतदान वेगाने झाले. दुपारी एक ते चार वाजेपर्यंत मतदानाची गती मंदावली. त्यानंतर पुन्हा ठिकठिकाणी मतदान केंद्रावर गर्दी पहावयास मिळाली. शहरातील २५ मतदान केंद्रावर रात्री ८.४५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. मतदान प्रक्रियेदरम्यान शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे, उबाठा शिवसेनेचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, एकनाथ जाधव, संजय निकम, अॅड आसाराम रोठे, पंकज ठोंबरे, मनाजी मिसाळ, मंजाहरी गाढे, अकिल कुरेशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी व कार्यकर्ते लक्ष ठेवून होते.
दरम्यान सकाळी मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. दुपारनंतर मतदान केंद्रावरील रांगा कमी होतांना दिसून आल्या. उन्हाची तीव्रता कमी असूनही मतदारांचा जो उत्साह अपेक्षित होता. तो दिसून आला नाही. परिणामी विधानसभा मतदारसंघात सरासरी केवळ ६५ टक्केच मतदान झाले. मतदानाची नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी वैजापूरसह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर जाऊन भेट दिली. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड व तहसीलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.
पावसामुळे उडाली दाणादाण
दरम्यान मतदान प्रक्रिया सुरू असतानाच शेवटी शेवटी साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी दाणादाण उडाली. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या असतानाच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. साधारणतः १० ते १५ मिनिटे झालेल्या पावसामुळे मतदान केंद्रावर दाणादाण उडाली.