आवर्तन सोडण्याची शक्यता धुसर
नाशिक जिल्ह्यातील धरण समूहात जेमतेम जलसाठा शिल्लक असल्याने वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे आवर्तन सोडणे शक्य नाही. असे पत्र लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिल्यामुळे नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन सोडण्याची आता शक्यता धुसर झाली आहे. नांमकासाठी देय कोट्यापेक्षा जास्त पाणी सोडण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नांमकाच्या पाण्याचे प्रकरण थेट राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आले आहे.
नांदूर मधमेश्वर कालवा. |
गेल्यावर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे यंदा वैजापूर व गंगापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी दोन्हीही तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. याबाबत येथील नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांना ( कडा) एक एप्रिल रोजीच पत्र पाठवले होते. परंतु सव्वा महिना उलटूनही अद्याप आवर्तन सोडण्यात आले नाही.
याच मागणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी येथील नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. परंतु आवर्तन सोडण्याबाबत कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांनी असमर्थता दर्शविली. त्यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण ( छत्रपती संभाजीनगर व नाशिक) कार्यालयाशी झालेल्या पत्रव्यवहाराचा. संदर्भ देऊन आवर्तन सोडणे शक्य नसल्याचे पत्र आंदोलकांना दिले आहे.
काय म्हटले आहे 'त्या' पत्रात
नाशिकच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांनी नांदूर मधमेश्वर कालव्याचा देय पाणीकोटा ३११८ दशलक्ष घनफुटापेक्षा जास्त झाला आहे. गोदावरी कालव्यांचा मे महिन्यातील प्रस्तावित आवर्तनासाठी जेमतेम जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे आवर्तन / पाणी सोडणे शक्य नाही. असे पत्र २ मे रोजी येथील नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाला पाठविले आहे. तसेच ३ मे रोजीच्या पत्रानुसार छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांची नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत नांदूर मधमेश्वर जलद कालव्यास तात्काळ उन्हाळी आवर्तन सोडण्याबाबत झालेल्या बैठकीत सुधारित पाण्याची आकडेमोड करण्याबाबत सुचित केलेले होते.
याबाबत वरीष्ठ कार्यालयास योग्य तो अहवाल सादर केलेला आहे. त्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या ( छत्रपती संभाजीनगर) पत्रानुसार सविस्तर मुद्देनिहाय अहवाल शासनास सादर केलेला असून वैजापूरसह गंगापूर व कोपरगाव तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर जलद कालव्याव्दारे उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रकरण शासनास वर्ग करण्यात आलेले आहे. शासनाकडून पुढील निर्देश प्राप्त होताच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. उन्हाळी आवर्तन सोडण्याबाबत धोरणात्मक निर्णय शासनास सादर असल्याने आवर्तन सोडण्याचा निर्णय या कार्यालयाच्या अखत्यारित नाही. असे पत्र नांमकाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांनी आंदोलकांना दिले.
शहराचे आवर्तनही लांबणीवर
दरम्यान ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली असतानाच वैजापूर शहरातही गेल्या काही दिवसांपासून पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. शहरासाठी फेब्रुवारी महिन्यात नाशिक पाटबंधारे विभागाकडून शेवटचे आवर्तन आले होते. १० मे नाशिक पाटबंधारे विभागाकडून आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले होते. परंतु पिण्याच्या पाण्याचे आवर्तनही अद्याप अनिश्चिततेच्या भोवऱ्यात आहे. याबातही अद्याप निर्णय झालेला नाही. नांदूर मधमेश्वर कालवा व घोयगाव साठवण तलावात आवर्तन सोडण्याचा निर्णय नाशिक पाटबंधारे विभागावर अवलंबून आहे.