वैजापूर न्यायालयाचा निकाल
तरुणाशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीचा आईसह अल्पवयीन भावाने कोयत्याने सपासप वार करून मुंडके धडावेगळे करून खून केल्याप्रकरणी वैजापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान हे खूनप्रकरण अख्ख्या राज्यात गाजले होते.
आरोपी शोभा मोटे व संकेत मोटे |
संकेत संजय मोटे व शोभा संजय मोटे रा. गोयगाव असे मायलेकांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, या घटनेतील मृत किशोरी उर्फ कीर्ती थोरे हिने वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील अविनाश संजय थोरे याच्याशी पळून जाऊन आळंदी येथे प्रेमविवाह केला होता. कीर्ती पळून गेल्यानंतर तिच्या वडिलांनी वीरगाव पोलिस ठाण्यात ती हरविल्याची तक्रार दिली होती. परंतु काही दिवसांनंतर ते दोघे लग्न लावून घरी परतले. याशिवाय त्यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात जाऊनही ही माहिती दिली होती. त्यावेळी कीर्तीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यातच अविनाशला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
मृत कीर्ती थोरे |
दरम्यान ५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अविनाश व पत्नी कीर्ती हे दोघेही स्वतःच्या शेतात कांदे निंदत होते. घरातील अन्य सदस्य दुस-या शेतात कापूस वेचत होते. अविनाशची तब्येत खराब झाल्याने तो घरी जाऊन आराम करतो. असे म्हणून तो शेतातीलच घरी गेला. त्यांनतर दुपारच्या सुमारास त्याची पत्नी कीर्ती, तिची आई शोभा मोटे व भाऊ संकेत मोटे यांचा स्वयंपाकघरात बोलण्यासह मांडणीवरुन डबा पडल्याचा आवाज अविनाशला आल्यामुळे त्याने किचनमध्ये जावून पहिले असता पत्नी कीर्ती जमीनवर पडलेली होती. आई शोभा मोटे हीने कीर्तीचे पाय पकडलेले होते तर भाऊ संकेत मोटे हा तिच्या गळ्यावर कोत्याने सपासप वार करीता होता. त्यावेळी अविनाशने सोडविण्याचा प्रयत्न केला असता संकेतने अविनाशवरही कोयता उगारला. त्यामुळे तो घाबरून तो किचनच्या बाहेर पळाला. या घटनेनंतर त्याने चुलती व आजीला बोलावले असता त्या दोघीही पळत आल्या.
हातात शीर घेऊन सेल्फी
त्याचवेळी संकेत मोटे व शोभा मोटे या दोघांनी कीर्तीस जिवंत मारुन तिचे मुंडके धडावेगळे करुन ओट्यावर घेवून आले व खिशातला मोबाईल काढुन संकेत मोटे याने मुंडक्यासह सेल्फी घेत मुंडके ओट्यावर टाकून दिले. दरम्यान याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी तपास करून येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे पुरव्यादरम्यान ९ साक्षीदाराच्या साक्षी नोंदविल्या. त्यात अविनाश संजय थोरे , डॉ. वैशाली हजारी यांची साक्ष व रासायनिक विश्लेषण अहवाल महत्वाचा ठरला.
२१ व्या वर्षी तुरुंगात रवानगी
साक्षी पुरव्याअंती आरोप सिध्द झाल्यामुळे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम.ए. यांनी आरोपी संकेत संजय मोटे याला जन्मठेप व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महीने साध्या कारावासाची शिक्षा,कलम ४४९ अन्वये पाच वर्षे शिक्षा व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांची साधा कारावासाची शिक्षा, तसेच कलम ४५२ नूसार ३ वर्षे शिक्षा व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसाची साध्या कारावासाची शिक्षा तसेच बाल गुन्हेगार कायदानुसार वयाचे २१ वर्षे होईपर्यंत बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश पारीत केले. तसेच वयाचे २१ वर्षे पूर्ण झाल्यांनतर तुरुंगात हस्तांतरीत करण्याचे आदेश पारीत केले.
आईलाही जन्मठेप
शोभा संजय मोटे हिलाही जन्मठेपेची शिक्षा, एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महीने साध्या कारावासाची शिक्षा, कलम ४४९ अन्वये पाच वर्षे शिक्षा व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांची साधा कारावासाची शिक्षा, कलम ४५२ नूसार ३ वर्षे शिक्षा व ५०० रुपये दंड, दंड रु न भरल्यास १५ दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीस कलम १२० बी भादवी व ४|२५ भाहका या कलमातून निर्दोष मुक्तता केली आहे.