वैजापूर मतदारसंघातील प्रश्नांना बगल
लोकसभा निवडणुकीचा धुरळा सध्या जोरात सुरू आहे. उन्हाच्या झळांबरोबरच निवडणुकीचे वातावरणही चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत विविध राजकीय पक्षांच्या बैठका व सभा झाल्या. या सभांतून मुलभूत व स्थानिक प्रश्नांना बगल देऊन नेतेमंडळी एकमेकांवर आखपाखड करून तोंडसुख घेण्यातच दंग आहेत. मुख्य प्रश्न व विकासकामांबात कुणीच बोलायला तयार नाही. परिणामी मुळ प्रश्न बाजूला पडले आहेत.
बिगुल वाजला अन् त्याचबरोबर शहरासह ग्रामीण भागात निवडणुकीची चर्चा झडायला सुरवात झाली. आता उन्हाच्या तापमानाबरोबरच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीतील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शहरासह ग्रामीण भाग पिंजून काढायला सुरवात केली आहे. ठिकठिकाणी बैठका, सभा सुरू आहे. शिळ्या कढीला ऊत आल्याप्रमाणे तेच मुद्दे, तेच गुद्दे अन् त्याच भाषणबाजीमुळे मतदार या नेत्यांना 'मनोरंजना'पलिकडे गांभीर्याने घ्यायला तयार नाही. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, उबाठा सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे उमेदवार तथा मंत्री संदीपान भुमरे या प्रमुख उमेदवारांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये सभा, बैठका घेतल्या. परंतु एकमेकांवर 'राळ' उठविण्यापलिकडे त्यांच्या भाषणातून काहीच निघत नाही.
विरोधक मोदींच्या नावाने शिमगा करण्यातच धन्यता मानत आहेत. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांचीही शहरात सभा झाली. परंतु त्यांनी भाषणातून केवळ नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य करून टीकेची झोड उठवली. त्यानंतर इम्तियाज जलील यांनीही तोच कित्ता गिरवत विरोधक उमेदवारांवर तोंडसुख घेतले. हिच परिस्थिती कमीजास्त अन्य उमेदवारांची आहे. एकमेकांवर वैयक्तिक टीकाटिप्पणी, आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडून आम्हीच कसे 'बावनकशी' सोने हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. परंतु आम्ही मतदारसंघात काय 'दिवे' लावले. हे सांगायला कुणीच धजावत नाही. मुळातच यावर बोलायलाच त्यांच्याकडे काहीच नसल्याने दुसऱ्यावरच 'चिखलफेक' करून तोंडाच्या 'वाफा' गमावित आहेत. परंतु ताकदवर मुद्दे कुणाकडेच नाही. केवळ राजकीय मुद्द्यांचे भांडवल करून 'सर्कस' सुरू आहे. कुणाच्याही भाषणातून भविष्यातील व्हिजन, कार्यक्रम दिसून येत नाही. तो तसा, हा असा करून नेत्यांची राजकीय पतंगबाजी सुरू आहे.
मुळातच शहर व ग्रामीण जनतेचे प्रश्न काय आहेत? याचा अभ्यास करण्याची नेत्यांना गरज आहे. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही मुलभूत प्रश्न संपलेले नाहीत. देशाची वाटचाल महासत्तेकडे असल्याचे भाषणातून सांगताना टाळ्या पडत असल्या तरी पाणी, आरोग्य, रस्ते व वीज प्रश्नांभोवतीच अजून राजकारण घिरट्या घालत आहेत. या पलिकडे नेत्यांची भाषणे पुढे सरकायला तयार नाही. मोबाईल, संगणक, विज्ञानयुगाच्या गप्पा होत असल्या तरी ग्रामीण भागातील समस्या भयावह आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या पाचवीला पुजल्याप्रमाणे त्याच्या समस्या पिच्छा सोडायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच त्यावर कुणी 'ब्र' शब्द काढायला तयार नाही. याशिवाय चारा छावण्या व दुष्काळी परिस्थिती, रस्ते, वीज, आरोग्य व सिंचनप्रश्न आदी समस्या 'आ' वासून उभ्या आहेत. आजही विधानसभा मतदारसंघातील गावांकडे जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ते नाहीत. कित्येक पावसाळे गेले अन् आले. कित्येक निवडणुका झाल्या. परंतु हे प्रश्न आजही कायम आहे. ज्यांनी २० - २० वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात सत्ता गाजविली. परंतु हे प्रश्न सुटण्याऐवजी आणखी जटिल बनत गेले. प्रश्न आजही तेच आहेत. फक्त कमीजास्त उमेदवार बदलतात.
काय आहेत ज्वलंत प्रश्न?
वैजापूर विधानसभा मतदारसंघात नांदूर मधमेश्वर कालव्यासह रोटेगाव औद्योगिक वसाहत, विनायक सहकारी साखर कारखाना, रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना, मन्याड साठवण तलाव उंची वाढविणे, विद्युत उपकेंद्र, रस्ते आदी विविध ज्वलंत प्रश्न आहेत. याच मुद्द्यांवर राजकारण्यांनी अनेक निवडणुका लढविल्या. परंतु गेल्या २५ वर्षांत या समस्या सुटल्या नाहीत किंबहुना हेतूपुरस्सर सोडविल्या गेल्या नाहीत. असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल. हे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय नेतृत्वांकडे इच्छाशक्तीच नव्हती.
उमेदवारांची तारेवरची कसरत
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सात दिवस शिल्लक आहे. उन्हामुळे नागरिक बाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे उमेदवारांना सभा घ्यायच्या असेल तर भल्या सकाळी गावात जाऊन ठाण मांडावे लागते. दुपारपर्यंत जेवढे गावे कव्हर करता येतील. तेवढी गावे कव्हर करण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत. त्यानंतर पुन्हा सायंकाळच्या सत्रात उमेदवारांना सज्ज राहवे लागते. त्यातच लग्नसराई जोरात आहे. त्यामुळे उमेदवारांना तेथेही हजेरी लावावी लागते. अशा परिस्थितीत उमेदवारांची मोठी कसरत होत आहे.
छाया स्त्रोत - गुगल