स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया होऊन आता नेत्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये 'आकडेमोड' सुरू झाली आहे. सर्वच पक्षांच्यावतीने आपल्या सोयीनुसार राजकीय समीकरणे लावली जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता नेहमीच शिवसेनेच्या मागे राहिलेला वैजापूर विधानसभा मतदारसंघ यंदा कुणाला कौल देतो? दोन शिवसेनेच्या खेचाखेचित एमआयएमचा 'पतंग' किती उडतो? हे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण, मशाल की पतंग? अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे. स्थानिक विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून या निवडणुकीवरच त्यांचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. निवडणुकीत सर्वांनीच विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच काम केले. दरम्यान निवडणूक संपताच शहरासह ग्रामीण भागात निवडणूक निकालावर चर्चा सुरू झाली असून निकालावर अनेकांनी पैजा, शर्यती लावल्या आहेत. त्यामुळे निकालाबाबत आता सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान घेण्यात आले. उन्हाचा तडाखा अन् त्यात लोकशाहीचा हा उत्सव पाहता विविध राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांसह मतदारांची चांगलीच दमछाक झाली. साधारणतः दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. वैजापूर विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी एमआयएमचे खासदार तथा उमेदवार इम्तियाज जलील, शिंदेसेनेचे संदीपान भुमरे व उबाठा शिवसेनेचे चंद्रकांत खैरे या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच 'फाईट' झाली. उर्वरित उमेदवारांची मतदारांनी फारशी 'दखल' घेतली नाही. नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहणारा विधानसभा मतदारसंघ यंदा फूट पडलेल्या कोणत्या शिवसेनेच्या पाठीशी राहतो. याचा कल कळायला अवघड जात आहे.
सुरवातीला खैरेंचा बोलबाला चालू झाला असला तरी सरतेशेवटी भुमरेंनीही चांगलीच मात दिली. या दोन्हीही सेनेचे स्थानिक पातळीवर पक्ष संघटन बळकट आहे. भुमरेंच्या सोबतीला स्थानिक भाजप नेते व कार्यकर्तेही सोबत होते. त्याउलट एमआयएमचे स्थानिक पातळीवर फारसे तगडे पक्षसंघटन नसून जलील यांची पूर्ण मदार मुस्लिम मतांवर आहे. यंदाच्या निवडणुकीत 'वंचितने' साथ सोडल्याने दलित मतदार दुरावला होता. गेल्या निवडणुकीत विजयासाठी वंचितने मोठा हातभार लावला होता. परंतु असे असले तरी ही मते त्यांना झाली नाही. असेही नाही. कोणतेही संघटन नसतानाही त्यांचा 'पतंग' बऱ्यापैकी उडाल्याची चर्चा आहे. तसेच धनुष्यबाण व मशालीतही चांगलीच खेचाखेची झाल्याचे पहावयास मिळाले.
शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार) नेते भाऊसाहेब ठोंबरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, एकनाथ जाधव, बाबासाहेब जगताप, पंकज ठोंबरे, उबाठा शिवसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, बाळासाहेब संचेती, संजय निकम, अॅड आसाराम रोठे, डॉ . राजीव डोंगरे या सरदारांनीही आपापल्या पक्षांच्या उमेदवारांसाठी जिवाचे रान करून प्रतिष्ठा पणाला लावत अख्खा मतदारसंघ पिंजून काढला. निवडणूक आखाड्यात वेगवेगळ्या घटकातील उमेदवार असल्यामुळे शेवटी - शेवटी जातीय समीकरणांनी जोर धरल्याचे पहावयास मिळाले.
परंतु असे असले तरी संपूर्ण मराठा समुदाय भाजप -सेनेच्या पाठीशी होता. असे म्हणता येणार नाही. मतविभाजन येथेही झालेच. मराठा आरक्षण आंदोलनाची धग या समुदायात असल्याने शिंदेसेना - भाजपवर त्यांची नाराजी होतीच. याशिवाय शेतमालाच्या धोरणामुळे शेतकरी वर्ग भाजपपासून थोडा दुरावला आहे. नाही म्हणायला या सर्व बाबींचे कमीजास्त पडसाद निवडणुकीत पहावयास मिळाले. गेल्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधवांनी या मतदारसंघातून मोठी मते मिळविली होती. परंतु यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना जवळ केले नाही.
निकालावर मंथन सुरू
दरम्यान लोकसभा निवडणूक संपली खरी. परंतु निवडणूक फिवर अजून उतरायला तयार नाही. निवडणुकीचे कवित्व संपले असले तरी आता निकालावर मंथन सुरू झाले आहे. नेत्यांसह कार्यकर्ते व नागरिकांनी आता आकडेमोड सुरू केली आहे. जातीनिहाय मतदारांची मोजणी करून याचा फायदा कोणत्या उमेदवाराला होईल? याचे ठोकताळे सध्या सुरू आहे. आकडेमोड व ठोकताळे काही असले तरी यासाठी तब्बल २० दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहेत. तोपर्यंत माञ निवडणूक निकालावर चर्वितचर्वण सुरू राहणार आहे. हे माञ निश्चित.
कट्ट्यावर रंगल्या चर्चा
एकीकडे निकालाची उत्सुकता तर दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागात पैजा सुरू झाल्या आहेत. भुमरेंचा 'धनुष्यबाण' चक्रव्यूह भेदणार का? खैरेंची 'मशाल' पेटणार का? जलील यांचा 'पतंग' गगन भरारी घेणार का? अशाच चर्चा शहरातील कट्टे व ग्रामीण भागातील कुचर ओट्यांवर रंगल्या आहेत.
मतदानाचा टक्का वाढला
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत ४ टक्के मतदान अधिक झाले आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत ६१ टक्के तर यंदाच्या निवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले. म्हणजेच मतदानाचा टक्का वाढला असून हा टक्का कुणाच्या पारड्यात पडणार? हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.