४०० क्युसेकने विसर्ग सुरू
वैजापूरसह गंगापूर व कोपरगाव तालुक्यांसाठी २५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास अखेर नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे ४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. या आवर्तनातून ८०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार असून पिकअप वेअरच्या मुखातून ८०० क्युसेकने विसर्ग सोडल्यास साधारणतः १२ दिवस आवर्तन सुरू राहील. कालव्यातून ८०० क्युसेकने विसर्ग सुरू ठेवायचा असेल तर मुखातून १२०० क्युसेकने विसर्ग सोडणे अपेक्षित आहे. पायथ्याशी म्हणजेच गंगापूर तालुक्यात पाणी पोहोचण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे सोडण्यात येणारे पाणी पाहता ते सर्वांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी आहे. पाणीचोरी, बाष्पीभवन व गळती पाहता पाणी शेवटपर्यंत पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे दोन्हीही तालुक्यात पाण्याची बोंब होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून वैजापूर - गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी होत होती. नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे आवर्तन सोडण्यासाठी दोन्हीही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी केलेली आंदोलने, शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी लावलेल्या रेट्यामुळे शासनाने २३ मे रोजी नांदूर मधमेश्वर कालव्यातून वैजापूरसह गंगापूर व कोपरगाव तालुक्यांतील १०२ गावांसाठी आकस्मिक आवर्तन सोडण्याचे आदेश युध्दपातळीवर दिले. परंतु दोन दिवस उलटूनही आवर्तन सोडण्याबाबत हालचाली होत नसल्याचे दिसून न आल्याने लाभक्षेत्रातील गावांतील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. परंतु २५ मे रोजी सकाळी नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे पाणी सोडण्यासाठी नाशिक येथील दारणा धरणातून पाणी निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमध्ये सोडण्यात आल्याचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले शेतकरी काही प्रमाणात शांत झाले.
दरम्यान नाशिकच्या दारणा धरणातून निफाड येथील नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमध्ये ४०० क्युसेकने विसर्ग सुरू होता. पिक अप वेअरमध्ये पातळीपर्यंत पाणी आल्यानंतर सायंकाळी कालव्याद्वारे ४०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. या आवर्तनातून ८०० दशलक्ष घनफूट मिळणार असून पिकअप वेअरमधून १२०० क्युसेकने विसर्ग सोडला तरच कालवा ८०० क्युसेकने चालेल. त्यानुसार १२ दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. परंतु यापेक्षा कमी विसर्ग सोडल्यास पाणी पायथ्याशी म्हणजेच गंगापूर तालुक्यात पोहोचण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार आहे.
याशिवाय पाणीचोरी, बाष्पीभवन व अन्य अपव्यय पाहता पाण्याची मोठी गळती अनिवार्य आहे. त्यामुळे ८०० दशलक्ष घनफूट पाणी देण्याचे नियोजित असले तरी साधारणतः ४५० दशलक्ष घनफूटच पाणी मिळणार आहे. कालव्याव्दारे मिळणारे पाणी पाहता अत्यंत कमी आहे. या पाण्यातून तिन्हीही तालुक्यांची तहान कशी भागली जाणार? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आवर्तनाचे दिवस वाढवावे लागणार आहे. ८०० दशलक्ष घनफूट पाणी सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाला काटेकोरपणे नियोजन करून मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान कालव्यात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
कसे आहे पाण्याचे नियोजन?
दरम्यान नांदूर मधमेश्वर कालव्यातून आवर्तन सोडण्याच्या पार्श्वभूमीवर नांदूर मधमेश्वर कालवा विभागाने सर्वांना पिण्यासाठी पाणी मिळण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. पाण्याची उपलब्धता पाहता त्यानुसारच नियोजन करण्यात आले आहे. 'नांमका'तून आवर्तन सोडल्यानंतर वितरिकेच्या ३० टक्के लांबीपर्यंत पाणी सोडून गावागावांतील सार्वजनिक विहिरी व तलाव भरून देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांना पिण्यासाठी पाणी मिळून बोंब होणार नाही.
खबरदार.. पाणी चोराल तर.!
'नांमका'त पाणी सोडल्यानंतर पाण्याची चोरी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथके तैनात करून निगराणी ठेवण्यात येणार आहे. कालव्यात पाणी सोडल्यानंतर बहुतांश शेतकरी विद्युतपंप टाकून पाणी चोरी करतात. पाण्याची चोरी करण्याचा प्रयत्न कुणी केल्यास संबंधितांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
टँकरने पाणीपुरवठा करा
वैजापूर तालुक्यात टँकरची शंभरी पार झालेली आहे. 'नांमका'च्या लाभक्षेत्रासह अख्खा तालुका टंचाईच्या विळख्यात सापडलेला आहे. खासगी विहिरींनीही तळ गाठल्याने जनतेला पाणी पुरवायचे कसे? असा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे अन्य गावांना पाणी पुरविण्यासाठी कालव्यातून पाणी भरून टँकरव्दारे पाणी उपलब्ध करून देता येईल. परंतु त्यासाठी महसूल व पंचायत समिती प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. अशी अपेक्षा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे.
वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे पाणी सोडण्याच्या पार्श्वभूमीवर २५ मे रोजी नाशिकच्या दारणा धरणातून ४०० क्युसेकने विसर्ग निफाडच्या नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमध्ये सोडण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी नांदूर मधमेश्वर कालव्यात ४०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. या आवर्तनातून ८०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार असून १२ दिवस आवर्तन सुरू राहणार आहे.
- राकेश गुजरे, कार्यकारी अभियंता, नांमका, वैजापूर