तात्काळ यंत्र बदलली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १३ मे रोजी वैजापूर शहरासह ग्रामीण भागातील २५ पेक्षा अधिक मतदान केंद्रावर रात्री ९ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. बहुतांश मतदार दुपारी चार वाजेनंतर मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदान केंद्रावर गर्दी होऊन रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया चालली. शहरातील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग व मतदारसंघातील बगडी येथे सर्वात जास्त रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील वाहेगाव व शिंगी येथील मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ व्यत्यय आला होता. परंतु यंत्र तात्काळ बदलण्यात आले.
वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे सायंकाळनंतर मतदारांची रांग लागली. |
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १३ मे रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी मतदारांचा उत्साह दिसून आल्यानंतर दुपारच्या सुमारास ही गती मंदावली होती. परंतु दुपारी चार वाजेनंतर मतदारांचा जत्थ्याचा जत्था बाहेर पडू लागल्याने शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच रांगा लागल्या. शहरातील २५ व ग्रामीण भागातील बहुतांश मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदारांची गर्दी पहावयास मिळाली. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील व गंगापूर तालुक्यातील वाहेगाव व शिंगी येथील मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ व्यत्यय आला होता. परंतु यंत्र तात्काळ बदलण्यात येऊन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली.
शहरातील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या मतदान केंद्रावर तर ग्रामीण भागातील बगडी, खंडाळा, पालखेड अशा एकूण २५ पेक्षा अधिक मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील तीन लाख १० हजार १७ पैकी २ लाख ८३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच ६४.८० टक्के मतदान झाले. एक लाख ६२ हजार ३४६ पुरूष मतदारांपैकी एक लाख ११ हजार ५८३ तर एक लाख ४७ हजार ६६९ स्त्री मतदारांपैकी ८९ हजार २८९ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रशासनाने मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा डांगोरा पिटविलाला होता. परंतु सुविधांचा बोजवारा उडालेला दिसून आला. त्यामुळे प्रशासनाचा हा दावा बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी ठरला.
'त्या' पाच गावांतही मतदान
दरम्यान नांदूर मधमेश्वर कालव्यात आवर्तन सोडण्यात येत नसल्याने वैजापूर विधानसभा मतदारसंघातील सावखेडगंगासह नांदूरढोक, वक्ती व मुद्देश वाडगाव येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय नागमठाण येथील गोदावरी नदीच्या वाळूपट्ट्याचा प्रशासनाने लिलाव केल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ऐनवेळी मतदारांनी तलवार म्यान करून मतदान केले. या पाचही गावांमध्ये ६० ते ७० टक्क्यांपर्यंत मतदान झाले