Crime | डिझेल विक्रीचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त

0

 बाजाठाणात एलसीबीची  कारवाई 



वैजापूर तालुक्यातील बाजाठाण येथे अवैधरित्या डिझेल विक्री करणाऱ्यास छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडून त्याच्याकडून डिझेलसह टँकर असा एकूण १९ लाख ५४ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 





याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बाजाठाण येथे  अल्ताफ शकिल सय्यद ( २३ रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव जि. अहमदनगर) हा अवैधरित्या डिझेल साठवून विक्री करीत असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार २३ मे रोजी भल्या सकाळी पोलिसांनी बाजाठाण शिवारातील गट क्रमांक ८३ मध्ये जाऊन छापा टाकला असता १३ लाख ९२ हजार ३०० रुपये किंमतीचे १५ हजार ३०० लिटर डिझेल, ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे टँकर व रोख एक लाख १२ हजार ४५० असा एकूण १९ लाख ५४ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल अल्ताफ सय्यद याच्याकडे आढळून आला. वैजापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर पोलिसांनी पंचनामा करून हा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अल्ताफ सय्यद याच्याविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अवैधधंद्याचा अड्डा उद्ध्वस्त 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अल्ताफ सय्यद हा गेल्या अनेक दिवसांपासून हा धंदा करीत होता. स्थानिक यंत्रणेचा वरदहस्त असल्यामुळे बिनबोभाटपणे डिझेल विक्री सुरू होती. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून हा अवैधधंद्याचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. 

ठाणेप्रमुखांचे 'पितळ' उघडे

गेल्या कित्येक दिवसांपासून डिझेल विक्रीचा गोरखधंदा सुरू असताना वीरगाव पोलिसांना या बाबीची भणक कशी लागली नाही? त्यामुळे मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना येथे येऊन कारवाई करावी लागते. म्हणजेच घोडं कुठंतरी पेंड खातंय? असाच याचा अर्थ होतो. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे वीरगाव ठाणेप्रमुखांची 'हप्तेखोरी' चव्हाट्यावर आली असून त्यांचे पितळ उघडे पडले आहे. वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळूतस्करीसह मोठ्या प्रमाणावर अवैधधंदे फोफावले असून केवळ 'अर्थ'शास्त्राच्या तत्त्वावर सर्व काही बेफाम सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या भरवशावर न राहता स्वतः लक्ष घालण्याची गरज असल्याची अपेक्षा नागरिकांची आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top