Boycott of Voting | 'नांमका'च्या पाण्याचा प्रश्न पेटला; 'या' चार गावांत मतदानावर बहिष्कार

0

 १० मेपर्यंत अल्टीमेटम् 



नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला असून आवर्तन न सोडल्यामुळे वैजापूर विधानसभा मतदारसंघातील चार गावांतील मतदारांनी लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली असताना नाशिक पाटबंधारे विभागाकडून आवर्तन सोडण्यास टाळाटाळ होत आहे. लोकप्रतिनिधी निवडणुकीत व्यस्त आहेत तर जनता मात्र तहानलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे नांमकाचे आवर्तन सुटून जनतेची तृष्णा कधी शमणार? हे मात्र अनिश्चित आहे. दरम्यान याबाबत नागरिकांनी प्रशासनाला १० मेपर्यंतचा अल्टीमेटम् दिला आहे. 




उन्हाचा तडाखा वाढल्याने वैजापूर व गंगापूर तालुक्यातील नांदूर मधमेश्वर कालवा क्षेत्रातील गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.यासाठी  लेखी-तोंडी पाठपुरावा तसेच मॅरेथॉन बैठका झडत आहे. नाशिक नांदूर मध्यमेश्वर पाटबंधारे विभाग आवर्तन सोडन्यास टाळाटाळ करीत असल्याने वैजापूर विधानसभा मतदारसंघातील सावखेडगंगासह, मुद्देश वाडगाव, वक्ती, नांदूरढोक  या चार गावांतील नागरिकांनी नांदूर मधमेश्वर कालव्यात १० मेपर्यंत आवर्तन सोडणार नसल्यास येत्या १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड व नांदूर मधमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांना निवेदन व ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. या गावांतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहे तर दुसरीकडे नागरिकांच्या या निर्णयामुळे प्रशासनही पेचात सापडले आहे. 


सव्वा महिन्यापूर्वी दिले पत्र 


वैजापूरसह  गंगापूर या दुष्काळग्रस्त तालुक्यांसह कोपरगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.‌ त्यामुळे २०२३-२४ या वर्षासाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून एक हजार ४९९ दशलक्ष घनफूट आवर्तन तात्काळ सोडावे. अशी मागणी येथील नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाने छत्रपती संभाजीनगर येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) अधिक्षक अभियंता तथा प्रशासकाकडे केली आहे.‌ याबाबत 'नांमका'ने एक एप्रिल रोजीच पत्र पाठवले आहे. परंतु सव्वा महिना उलटूनही याबाबत प्रशासकिय स्तरावर कुठलीही हालचाल दिसून येत नाही.‌ दुसरीकडे या तिन्ही तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत असल्याने नागरिक पाटबंधारे विभागाबाबत रोष व्यक्त करीत आहेत. नाशिक पाटबंधारे विभागाने १४९९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाच्या नावावर पळविल्याचा आरोप होत आहे.


तिन्हीही आमदारांची मागणी 


नांदूर मधमेवर जलदगती कालव्यातून पाणी सोडण्याबाबत यापूर्वीही शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्यासह कोपरगाव व गंगापूरच्या आमदारांनी पाटबंधारे विभागाला पत्र दिलेले आहे. विशेष म्हणजे २०२३-२४ या वर्षांकरिता छत्रपती संभाजीनगर येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नाशिक विभागाकडे कालव्याच्या आवर्तनाकरीता ४५५९ दशलक्ष घनफूट म्हणजेच १२९.१२ दलघमी पाण्याची मागणी केलेली असतांना नाशिक विभागाने ३०६० दशलक्ष घनफूट म्हणजेच ८६.६६ दलघमी एवढेच पाणी उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे वैजापूरसह गंगापूर व कोपरगाव तालुक्याच्या हक्काचे पाणी नाशिकने पळविले असून याबाबत लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज असल्याची अपेक्षा लाभधारक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top