Fraud | बोगस दुकानदाराचा पर्दाफाश; कपाशीचे बियाणे पकडले

0

२२ पाकिटे हस्तगत 



विक्री करण्याचा परवाना नसतानाही बियाणांची साठवणूक करून शेतकऱ्यांना चढ्या दराने विक्री करणाऱ्या बोगस दुकानावर कृषी विभागासह पोलिसांच्या पथकाने छापा टाकून २२ बियाणांच्या पाकिटांसह बिलबुक हस्तगत केले आहे. २३ मे रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




 

       ज्ञानेश्वर काकासाहेब काळे (रा.गोडेगाव ता.नांदगाव जि. नाशिक ह.मु. स्वामी समर्थनगर, वैजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैजापूर शहरातील स्वामी समर्थनगर परिसरातून कपाशीची बियाणे अनधिकृतपणे चढ्या दराने विक्री होत असल्याबाबतची माहिती येथील पंचायत समिती कार्यालयातील कार्यरत कृषी अधिकारी जगदीप वाघमारे यांना मिळाली. माहिती मिळताच वाघमारे यांनी पोलिस पथकासह २३ मे रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता पथकाला ज्ञानेश्वर काळे याच्या राहत्या घरात एका विशिष्ट कंपनीच्या बियाणांचा साठा करून ठेवल्याचे आढळून आले. 


 



हे बियाणे कुठून व कशी आणली ? याबाबत पथकाने त्याच्याकडे विचारणा केली असता ' हे बियाणे आपण कोपरगाव येथील दीपक मौनगिरी अॅग्रो  वितरकाकडून घेतले असून वैजापूर येथील एमआयटी कॉलेजसमोर असलेल्या एका अॅग्रो दुकानदाराला देण्यासाठी एकूण ४५ पाकिटे आणली होती. पैकी २३ पाकीट शेतकऱ्यांना विक्री केली' असल्याचे  सांगितले. त्याच्याकडून पथकाने उर्वरित २२ पाकीटे व रोटेगाव येथील एका अॅग्रो दुकानाचे बिलबुक हस्तगत केले. याप्रकरणी जगदीप वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ज्ञानेश्वर काळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख करीत आहे.


बियाणांचा तपशील मिळेना 

कारवाई दरम्यान पथकाने ज्ञानेश्वर काळे याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या बियाणांचा तपशील कोपरगाव येथील दीपक मौनगिरी अॅग्रो याच्याकडे उलट तपासणी केली असता या बियाणा संबंधीचा कुठलाही तपशील मिळत नसल्याचे कृषीअधिकारी वाघमारे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय बियाणे विक्रीचा कोणताही परवाना नसताना तो चढ्या दराने बियाणे विक्री करीत होता.

 

टोळ्या सक्रिय 

कृषी विभागाच्या पथकाने शहरातील बोगस दुकानदाराकडून मोठ्या प्रमाणावर बियाणे पकडून कारवाई केल्यामुळे शहरासह तालुक्यातील कृषी सेवा संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. कृषी विभागाने ही कारवाई केली खरी. परंतु याशिवाय ग्रामीण भागातील दुकानांतून बोगस बियाणे विक्री होत असल्याची चर्चा आहे. खरिप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. याचा फायदा घेऊन बोगस दुकानदार बोगस बियाणे विक्रीसाठी सक्रिय झाले आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा दुकानदारांवर नजर ठेवून कारवाई करण्याची गरज आहे. कठोर कारवाई केल्यास अशा बोगस दुकानदारांसह बियाणे विक्रीला लगाम बसेल. 



कृषी विभागाच्या पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले तेव्हा त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर बियाणांचा साठा आढळून आला. बियाणे बोगस नव्हते. परंतु बियाणे विक्री करण्याचा परवाना त्याच्याकडे नव्हता. तसेच शेतकऱ्यांना चढ्या दराने तो बियाणे विक्री करीत होता. याशिवाय बियाणे कोठून आणले? याचा ताळमेळ लागेना. त्यामुळेच काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहर अथवा तालुक्यात बोगस बियाणे अथवा विनापरवाना बियाणे विक्री करीत असेल तर त्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रार करावी.

- जगदीप वाघमारे, कृषी अधिकारी, पं. स. वैजापूर 


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top