११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
वैजापूर तालुक्यातील पुरणगाव येथून वाळूचे उत्खनन करून शासकीय वाळू डेपोवर वाहतूक करणाऱ्या ठेकेदारासह मजुरांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पुरणगाव येथील ११ जणांविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या शुक्रवारपासून तालुक्यात विविध ठिकाणी वाळूवरून मोठा राडा सुरू आहे.
याबाबत अनुराग अप्पासाहेब शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते ठेकेदारीचा व्यवसाय करतात. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे रहिवासी त्यांचे मित्र प्रशांत अंभोरे यांच्या अनन्या पेट्रोलपंपच्या माध्यमातून गोदावरी नदी पात्रातील अव्वलगाव, नागमठाण, भालगाव व पुरणगाव येथून वाळू उपसा करून शासकीय वाळू डेपोपर्यंत वाहतूक करून साठा करण्याचा २०२४ सालचा ठेका घेतला आहे. ज्यातून उपसा केलेली वाळू ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कामाला पुरविण्यात येणार आहे.
२१ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास वाळू वाहतूक करण्यासाठी शेतातून रस्ता उपलब्ध करून देणारे चंद्रकांत बोर्डे व मजूर उपस्थित असताना उत्खनन करून ते ट्रॅक्टरमध्ये वाळू भरीत होते. तेव्हा तेथे दादासाहेब ठोंबरे, प्रदीप कसबे, मनोज ऊर्फ विकास ठोंबरे, अक्षय ठोंबरे, इंदर ठोंबरे (सर्व रा. पुरणगाव)हे आपले ट्रॅक्टर घेऊन आले व बेकायदेशीरपणे वाळू उपसा करू लागले. तेव्हा शिंदे यांनी त्यांना समजावून आपल्याला कायदेशीर ठेका मिळाला असल्याचे सांगितले. त्यावेळी अक्षय याने आपला भाऊ मनोज याला ठेकेदार आपल्याला वाळू भरू देत नाही, असे सांगितले.
यानंतर मनोज हा ४-५ तरुणांसोबत तेथे आला. मनोजसह आलेल्या तरुणांनी तेथे असलेल्या मजुरांना मारहाण केली. तेव्हा शिंदे हे त्याच्याजवळ त्याला का मारत आहे? असा जाब विचारला तेव्हा मनोज ठोंबरे व अक्षय ठोंबरे यांनी शिंदे जवळ जात चाकूने गळ्यावर वार केला. मात्र शिंदे यांनी हात मध्ये टाकल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली. तेव्हा चंद्रशेखर बोर्डे हे वाचविण्यासाठी मध्ये पडले असता त्यांनाही चाकूने वार करून मारहाण सुरू केली. जबर मारहाण केल्याने बोर्डे हे बेशुद्ध पडले. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.