गोदापात्रात ठिय्या; प्रकरण चिघळले
गेल्या तीन दिवसांपासून वैजापूर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवरून राडा सुरू आहे. ठेकेदाराने गोदावरीत जेसीबी यंत्राच्या साह्याने बेकायदेशीररित्या उत्खनन करून वाळूची उचल केली आहे. परिणामी पात्रात बेसुमार खड्डे झाले आहे. त्यामुळे वाळू ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरुध पुरणगाव येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कारवाई करण्याच्या मागणीसाठी गोदापात्रातच ठिय्या मांडला. दरम्यान ग्रामस्थांनी तहसीलदारांसमोरच खड्ड्यांचे मोजमाप करून ठेकेदाराची पोलखोल केली.
गोदापात्रात ग्रामस्थांनी तहसीलदारांसमोर खड्ड्यांचे मोजमाप केले. |
शासनाचे नियम व अटी धाब्यावर बसवून जेसीबीच्या सहाय्याने पुरणगाव येथे सुरू असलेल्या वाळू उत्खननाच्या विरोधात कारवाई करा. या मागणीसाठी पुरणगाव येथील ग्रामस्थांनी आक्रमक होत गोदावरी नदी पात्रात ठिय्या दिला. तहसीलदारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून सार्वजनिक बांधकाम विभागमार्फत वाळूपट्ट्याचे मोजमाप करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण तात्पुरते निवळले. संबंधित ठेकेदाराने सराला बेटावर जसा वाळूचा एकही कण ठेवला नाही. तसा इथेही वाळूचा एकही कण ठेवणार नाही. आडवे आले तर जेसीबीच्या बकेट अंगावर टाकीन. अशी धमकी दिली असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी यावेळी केला आहे. ठेकेदाराच्या धमकीमुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी वैजापूर तालुक्यातील पूरणगाव येथील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करून तो साठवण्याचे काम सुरू आहे.मात्र या ठिकाणी शासनाने कुठलीही मार्किंग ठरवून दिलेली नाही. परिणामी सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून ठेकेदाराकडून जेसीबी यंत्राच्या साह्याने चार - पाच मीटरपेक्षाही अधिक खड्डे खोदून वाळूचे उत्खनन केले जात आहे. या उत्खननाला पुरणगाव येथील ग्रामस्थांचा विरोध आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सुनील सावंत यांनी पुरणगाव येथील गोदापात्रात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी जेसीबीद्वारे सुरू असलेला वाळू उत्खननाची चित्रफित काढून तहसीलदारांना दाखविली. जेसीबीच्या साह्याने सुरू असलेल्या वाळू उत्खननाचा व्हिडिओ काढून विरोध केल्यानेच नऊ जणांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. त्यामुळे ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
खड्ड्यांचे केले मोजमाप
गोदापात्रात जेसीबी यंत्राच्या साह्याने उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर वाळूची बेसुमार उचल करण्यात आली आहे. त्यामुळे तहसीलदारांसमोरच ग्रामस्थांनी जेसीबीद्वारे केलेल्या खड्ड्यांचे मोजमाप करून ठेकेदाराची पोलखोल केली. जेसीबीच्या साह्याने चार - चार मीटरपेक्षाही जास्त खड्डे खोदून उत्खनन करण्यात आल्याचे उघड झाले. त्यामुळे नियमबद्ध उपसा करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध महसूस प्रशासन काय कारवाई करते? हे मात्र येत्या काही दिवसांत समजणार आहे.