Sand Action | अतिरिक्त जिल्हाधिकारी पहाटेच गोदावरीत, स्थानिक अधिकारी मात्र 'झोपेत'

0

माफियांच्या टोळ्या सक्रिय, वाहने पकडली 


 

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत वाळूमाफियांच्या टोळ्या गोदापात्रात सक्रिय झाल्या असून गेल्या काही दिवसांपासून स्थानिक महसूल व पोलिस यंत्रणेच्या 'भरवशावर' बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. या बाबीची भणक छत्रपती संभाजीनगर येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना लागताच त्यांनी १७ मे रोजी भल्या पहाटेच वैजापूर तालुक्यातील पुरणागाव गोदापात्र गाठले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वाळूची तीन वाहने पकडून स्थानिक महसूल अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पाडले. त्यांच्या या कारवाईमुळे स्थानिक यंत्रणा 'हप्तेखोरी'च्या विळख्यात अडकली काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

 


अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी पकडलेली हिच ती वाहने.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणाच्या लक्ष जाणार नाही अशी शक्यता गृहीत धरून वाळूमाफियांच्या टोळ्या सक्रिय होऊन त्यांनी गोदावरी उजाड करण्याचा चंग बांधला. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून माफियांची खुलेआमपणे धूम सुरू असताना स्थानिक महसूल अधिकारी व पोलिस यंत्रणा मुग गिळून गप्प बसून होती. रात्रीच्या सुमारास वाळूच्या वाहनांची रस्त्यावरून रेलचेल सुरू असतानाही त्यांना कुणी अडवायला तयार नाही. ही सर्व यंत्रणा 'अर्थशास्त्रा'च्या तत्वावर चालत असल्यामुळे सर्वच सरकारी यंत्रणा 'मिंधी' होती. 


परंतु 'मांजर जरी डोळे मिटून दूध पीत असली' तरी तिला कुणी बघितले नाही. असा अर्थ होत नाही. शेवटी छत्रपती संभाजीनगर येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांना या बाबीची भणक लागलीच. १७  मे रोजी त्यांनी भल्या पहाटेच म्हणजेच पाच वाजता वैजापूर गाठून नंतर थेट तालुक्यातील पुरणगाव गोदावरी पात्र गाठले. तेथे त्यांनी वाळूचे टिप्पर पकडले. 


लोखंडे गोदावरीत पोहोचल्याची वर्दी लागताच पुरणगावसह आसपासच्या गावांतील गोदावरीतील बहुतांश माफियांनी धूम ठोकली. याशिवाय लोखंडे यांनी तालुक्यातील लाडगाव येथे आणखी दोन वाहने पकडली. यातील दोन वाहने पकडून वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रांगणात तर एक वाहन वैजापूर पोलिस ठाण्यात आणून उभी करण्यात आले आहे. या वाहनांमध्ये असलेली वाळू कायदेशीर आहे की बेकायदेशीर? याचा खुलासा चौकशीनंतरच होणार आहे. 


 महसूल यंत्रणा गाफील 


वास्तव पाहता अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांचा आजचा वैजापूर दौरा नियोजित होता. उपविभागीय अधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसह तलाठ्यांची आढावा बैठक आयोजित केल्यामुळे ते येणार असल्याचे निश्चित होते. परंतु ते भल्या पहाटेच येतील. याचा अंदाज कुणालाच नव्हता. परंतु लोखंडेंनी सर्व अंदाज मोडीत काढून स्थानिक यंत्रणेला गाफील ठेवून 'जोर का झटका धीरे से' दिला. त्यामुळे स्थानिक महसूल यंत्रणा भांबावून गेली अन् त्यांचे पितळ उघडे पडले. 


बैठकीत दिली सक्त ताकीद 


वैजापूर तालुक्यातील गोदापात्रासह शिवना नदी पात्रात माफियांनी घातलेला धुमाकूळ पाहता लोखंडे यांनी या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांसह तलाठ्यांना वाळूउपशाबाबत सक्त ताकीद दिल्याचे समजते. त्यांनी वाळूउपशाबाबत सक्त ताकीद दिली खरी. परंतु अधिकारी व तलाठी काय 'दिवे' लावतात. हे मात्र येत्या काही दिवसांत समजणार आहे. 



वैजापूर येथे आढावा बैठकीसाठी मी येणारच होतो. वाळूउपशाची भणक अगोदर असल्यामुळे मी भल्या पहाटेच गोदापात्र गाठले. वेगवेगळ्या ठिकाणी वाळूची तीन वाहने पकडण्यात येऊन ती वाहने पोलिस ठाणे व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रांगणात उभी करण्यात आली आहे. चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. 

- अरविंद लोखंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top