वैजापूर येथील सभेत माहिती
बहुचर्चित रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे ६५ कोटी रुपये कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असून नांदूर मधमेश्वर कालव्यात आवर्तन सोडण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.
वैजापूर येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी |
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रोहयोमंत्री संदीपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत, अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार, आमदार रमेश बोरनारे, आमदार संजय शिरसाठ, भाजपचे एकनाथ जाधव, जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, साबेरखान, पंकज ठोंबरे, संजना जाधव आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, वैजापूर तालुक्यातील बहुचर्चित रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जमाफीचा जिव्हाळ्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला होता. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी मार्च महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेचे ६५ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील जवळपास २० गावांतील शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होऊन दिलासा मिळणार आहे. याशिवाय नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन लांबणीवर पडल्याने तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याचे मला सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी तात्काळ आवर्तन सोडण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच तालुक्यातील शनिदेवगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात बांधण्यात येणाऱ्या उच्च पातळीच्या बंधाऱ्यासाठी राज्य सरकारने भरघोस कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. येणाऱ्या काळातही वैजापूर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. असेही ते म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे तालुक्यातील २० गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन लांबणीवर पडल्याने लाभक्षेत्रातील जवळपास ४५ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आवर्तनाचा विषय थेट राज्य शासनाच्या दरबारात गेल्याने याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्तन सोडण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या खऱ्या. परंतु आवर्तन केव्हा सोडणार? हा प्रश्न मात्र सध्या अनुत्तरीत आहे.
उध्द्वव ठाकरेंवर टीका
उध्द्वव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती. शिवसेनेचे काँग्रसीकरण झाले होते. आम्ही शिवसेना वाचवली. २०१९ ला जे झाले ते अपेक्षित नव्हते.ठाकरेंनी साडेबारा कोटी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसेन तेव्हा मी माझे दुकान बंद करीन. घरात बसून, फेसबुक लाईव्ह करून राज्य चालविता येते का? असे मुख्यमंत्री कधी कुणी पाहिले का? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
विरोधकांना चपराक
छत्रपती संभाजीनगरच्या नावावर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात शिक्कामोर्तब केले आहे. आमच्या सरकारचे हे यश असून विरोधकांना मात्र ही मोठी चपराक आहे. औरंगाबादचे नामकरण व्हावे. हे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते सरकारने पूर्ण केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
ओन्ली भुमरे..
लोकसभा निवडणुकीत ऐैरे गैरे नथू 'खैरें'चा भरणा आहे. परंतु असे असले तरी या निवडणुकीत ओन्ली भुमरेच बाजी मारणार आहे.
मशाल नव्हे 'टेंभा'
संदीपान भूमरे म्हणाले उद्धव ठाकरे व खैरेंना आम्ही सांभाळले. २० वर्षे फक्त आम्ही मदत केली म्हणून ते निवडून येत होते.आता माझी निशाणी धनुष्यबाण आहे. यापूर्वीही मी याच चिन्हावर निवडून आलो तर खैरेंची निशाणी मात्र बदलली आहे. ते जरी म्हणत असले की, त्यांची निशाणी मशाल आहे. परंतु ती मशाल नव्हे तर टेंभा आहे.