१४ दुचाकी हस्तगत, भामटे वैजापूरचेच
छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन दुचाकीचोर पकडून त्यांच्याकडून तब्बल १४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पकडलेले दोन्हीही भामटे वैजापूर तालुक्यातील असूच यातील प्रमुख सूत्रधार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माजी तालुकाध्यक्ष निघाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी १२ एप्रिल रोजी रात्री उशिरा या भामट्यांच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी १४ दुचाकींसह अजिंक्य बोडखे व दीपक जगताप याला ताब्यात घेतले. |
अजिंक्य उर्फ लाल्या बोडखे (१९ रा.बोरसर कारखाना ) व दीपक काकासाहेब जगताप रा.शिवराई रस्ता, वैजापूर) असे पोलिसांनी पकडलेल्या भामट्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून येथील पंचायत समिती कार्यालय परिसरातुन व मंगल कार्यालयाबाहेरून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. परंतु स्थानिक पोलिसांना काही केल्या चोरटे हाती लागत नव्हते. या पार्श्वभुमीवर छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेची पोलिस यंत्रणा या चोरट्यांच्या मागावर होती.
दुचाकीचोर अजिंक्य बोडखे व दीपक जगताप |
दरम्यान वैजापूर तालुक्यातील बोरसर (कारखाना) येथील अजिंक्य बोडखे या वैजापूरसह शिर्डी, येवला व आसपासच्या परिसरातील मोटारसायकली चोरी करून त्याचा साथीदार दीपक जगताप याच्यामार्फत कमी दरात विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने अजिंक्य बोडखे यास ताब्यात घेतले.
पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी |
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता चोरी केलेल्या मोटरसायकली आपण वैजापूर येथील दीपक जगताप याच्याकडे विक्री करण्यासाठी दिल्याचे त्याने सांगितले. त्याआधारे लगेचच पथकाने दीपक जगताप याला गाठले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखविला असता अजिंक्य बोडखे हा मोटारसायकली चोरी करून आपल्याकडे विक्रीसाठी आणून देत असल्याची कबुली त्याने दिली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२४ तासांतच चोरटे गजाआड
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरालगतील लासूरगाव रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाबाहेरून एकाची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट चोरी गेल्याची घटना घडली होती. याशिवाय एकाची तर चक्क न्यायालयाच्या आवारातून मोटारसायकल चोरी गेली. या दोन्हीही घटनेप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनेतील चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. २४ तासातच पोलिसांना अजिंक्य बोडखे व दीपक जगताप या दोघा चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले. दीपक जगताप हा गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. या चोरी प्रकरणात त्याचे नाव निष्पन्न झाल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.