१० मेला सुटणार आवर्तन
वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील घोयगाव साठवण तलावात फक्त दहा पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वैजापूरकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने शहरवासियांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ६० टँकरची मागणी केली आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातून १० मे रोजी घोयगाव साठवण तलावात आवर्तन सोडण्यात येणार असून तोपर्यंत शहरात 'पाणीबाणी' असणार आहे.
वैजापूर शहरालगचा नारंगी प्रकल्प कोरडाठाक पडला आहे |
गेल्यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात जलसाठा झाला नाही. एरवी या प्रकल्पातूनच शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु नारंगी प्रकल्पातील जलसाठा संपला आहे. नारंगीतील जलसाठा संपुष्टात आल्यानंतर वैजापूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी नाशिक जिल्ह्यावरच अवलंबून राहवे लागते. वैजापूर शहराला नशिक पाटबंधारे विभागाकडून पाणीपुरवठा केला जातो. यासंदर्भात पाटबंधारे विभागाचा वैजापूर नगरपलिकेशी करार झालेला आहे. या करारनुसार पिण्यासाठी दर महिन्याला कोपरगाव साठवण तलावात आवर्तन सोडले जाते.
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने घोयगाव येथील चार साठवण तलावात २८ एप्रिलपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरवासियांची तहान भागविण्यासाठी नगरपलिकेने साठवण तलावातील पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन केले आहे. नगरपालिकेच्या घोयगाव येथील १५ कोटी लिटर क्षमता असलेल्या चारही साठवण तलावात सध्यस्थितीत २८ एप्रिलपर्यंत शहरवासियांना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे.
घोयगाव तलावातील शिल्लक जलसाठा |
६० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन स्त्रोत आहेत. त्यापैकी नारंगी मध्यम प्रकल्प हा स्त्रोत नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या वर्षात पावसाच्या अवकृपेमुळे हा प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाच्या दारणा समूहाच्या गोदावरी डावा तट कालव्याव्दारे शहरासाठी ६० दिवसाला सोडण्यात येणाऱ्या १६८.६२ मिली लिटर पाणी साठ्यावर शहरातील पाणीपुरवठयाची भिस्त आहे. कोपरगाव तालुक्यातील घोयगाव येथे नगरपलिकेचे १५ कोटी लिटर क्षमतेचे चार साठवण तलाव आहेत. त्या साठवण तलावात पाईपलाईनद्वारे पाणी आणले जाते. ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन नळाद्वारे शहरवासियांना पुरविले जाते.
पालिकेचा गलथान कारभार
दरम्यान शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात जलसाठा उपलब्ध होता. परंतु परिसरातील शेतकऱ्यांनी प्रकल्पातील पाणी विद्युतपंपाव्दारे सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर बेसुमार उपसा केले. परिणामी आज वैजापूरकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने वेळीच पाणी उपशाला आवर घातला असता तर आज ही वेळ आली नसती. पालिकेच्या निष्काळजी व गलथान कारभारामुळे आज शहर पाणीटंचाईच्या खाईत लोटले गेले.
पाच दिवसाआड पाणीपुरवठा
नगरपालिकेच्या घोयगाव येथील साठवण तलावात अत्यल्पसाठा असल्यामुळे मार्चपासून शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापूर्वी पालिकेकडून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोयगाव साठवण तलावात सध्या २८ एप्रिलपर्यंत शहरवासियांना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे. नाशिक पाटबंधारे विभागाकडून १० मे रोजी आवर्तन सोडण्यात येणार आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरवासियांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ६० टँकरची मागणी करण्यात आली आहे.
- भागवत बिघोत, मुख्याधिकारी, वैजापूर