साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकानेच वाहनातील मालाचा अपहार केल्याच्या आरोपाखाली चालकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु 'त्या' वाहनातील माल हा चालकाने नव्हे तर आजूबाजूच्या गावातील भामट्यांनीच चोरून नेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केल्यामुळे भामट्यांची संख्या सहावर पोहोचली आहे.
सर्वप्रथम वाहन चालक मधुकर दामु साबळे (रा.सिद्धिविनायक अपार्टमेंट श्रमिकनगर सातपूर, नाशिक ता.जि. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चेतन गोरख काळे (रा. नारळा, ह.मु. बोरदहेगाव) , धनू नवनाथ वाघमारे, विजय कचरू डांगे ( दोघे रा. शिवराई) या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. ४ एप्रिल रोजी स्वप्निल भाउसाहेब शेलार, रविंद्र राजेंद्र शिंदे (दोघे रा. बोरदहेगाव) या दोघांनाही पोलिसांनी पकडून अटक केली आहे. त्यामुळे या चोरी प्रकरणातील भामट्यांची संख्या आता सहावर पोहोचली असून चालकाचा अपवाद वगळता अन्य पाच भामट्यांकडून वाहनातून चोरी केलेला मालासह चोरीसाठी वापरलेले वाहन असा एकूण ८ लाख ५३ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २७ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चालक मधुकर साबळे याने एका ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून एमआयडीसी वाळूज येथील आरएसपीएल लिमिटेड कंपनीतून घडी डिटर्जंट पावडर, एक्सपर्ट डिश वॉशचा पाच लाख १२ हजार ८१३ रुपये किंमतीचा माल आयशरमध्ये (क्रमांक एमएच १५ ईजी १९७६) भरला होता. हा माल नाशिक येथे द्यावयाचा होता. परंतु नागपुर-मुंबई महामार्गावरून जात असताना वैजापूर तालुक्यातील करंजगाव जवळील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला गेले. परंतु चालक मधुकर साबळे याने ट्रान्सपोर्ट मालकाला फोन लावून वाहनाचे ब्रेक फेल झाल्याचा बनाव केला.
यावेळी ट्रान्सपोर्ट मालकाने घटनास्थळी धाव घेत घटनेबाबत त्यांनी शहानिशा केली असता वाहन सुस्थितीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परंतु वाहनातून ३ लाख २४ हजार ९४१ रुपये किंमतीचा माल गायब असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठून चालकानेच मालाची हेराफेरी केल्याबाबत तक्रार दिली होती. दरम्यान तपासादरम्यान हा माल चालकाने नव्हे तर आजूबाजूच्या गावातील भामट्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणातील भामट्यांची आता सहावर पोहोचली आहे. यात आणखी काही भामटे निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.