आयशरमधील मालाचे 'हेराफेरी' प्रकरण
आयशर टेंपोचे ब्रेक निकामी होऊन माल चोरी झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन भामट्यांना अटक केली आहे. त्यामुळे या चोरीतील आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे. यामध्ये एक डीजे मालक व किराणा दुकानदाराचा समावेश आहे. दरम्यान या तिघांनाही न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई नागपूर महामार्गावर करंजगाव शिवारात शुक्रवारी वाळूज एमआयडीसीत प्रमोद आमटे यांचे भक्ती लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट आहे. त्यांनी गुरुवारी रात्री महाराणा प्रताप चौक वाळूज येथील आरएसपीएल लिमिटेड कंपनीतून घडी डिटर्जंट पावडर, एक्सपर्ट डिश वॉश, प्रोएसपी युनि वॉशचा एकूण ५ लाख १२ हजार ८१३ रुपयांचा माल आयशरमध्ये ( क्र. एम.एच. १५ इ.जी.७९७६ ) भरून दिला होता. हा माल नाशिक येथील नवदीप इंटरप्रायजेस, शिवा एजन्सी व विनायक डिस्ट्रीब्युटर या तिघांना देण्यात येणार होता. आमटे यांनी चालक मधुकर साबळे याच्याकडे भाडेपोटी ६ हजार ५०० रुपये रोख दिले होते. शुक्रवारी साबळेने फोन करून वैजापूर तालुक्यातील करंजगावजवळ वळणावर ब्रेक फेल झाल्याने गाडी रस्त्याच्या खाली जावून त्यातील माल चोरी झाल्याचे आमटे यांना कळविले होते.
त्यामुळे आमटे यांनी सहकारी इरफान पटेल यांच्यासोबत तातडीने करंजगाव गाठले. त्यावेळी त्यांनी परिसरात माहिती घेतली असता गाडीचे ब्रेक फेल नसून ती सुस्थितीत होती. चालक दारु पिलेला असल्याने टेम्पो रस्त्याच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाला होता. परंतु टेंपोत केवळ १ लाख ८७ हजार ८८२ रुपयांचा माल मिळून आला. गाडीतील घडी डिटर्जंट पावडर ४० किलोच्या २९, २५ किलोच्या २७, युनी वॉशच्या ३० बग तर बिग एक्सपर्ट डिश वॉशचे २५० खोके, प्रोएसपीचे ९ खोके व एक्सपर्ट अल्ट्राचे 3 बॉक्स असा एकूण ३ लाख २४ हजार ९३१ रुपयांचा माल चोरी झाला होता. त्यामुळे प्रमोद आमटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांत चालक मधुकर दामु साबळे याच्यावर २८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीसांनी साबळे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
तिघा भामट्यांना केली अटक
दरम्यान पोलिसांनी डीजे चालक व मालक चेतन गोरख काळे (२३ रा. नारळा) ,धनू नवनाथ वाघमारे (२६) व येथील श्रद्धा किराणा दुकानचे मालक विजय कचरू डांगे (५३) दोघे रा. शिवराई या तीन जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीस गेलेला ३ हजार ४४० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघांना येथील न्यायालयाने सोमवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली तर चालकालाही पुन्हा दुसऱ्यांदा चार दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. अधिक तपास फौजदार प्रविण पाटील करीत आहेत.
छाया स्त्रोत - गुगल