नियोजनशून्य कारभार
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत टंचाई समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वैजापूर तालुका दुष्काळसदृश्य घोषित करण्यात आलेला असताना प्रशासन याबाबत फारसे गंभीर नाही. असे सकृतदर्शनी दिसतेय. वैजापूर तालुक्यात दुष्काळाच्या झळा पोहचायला सुरुवात झाली असून अत्यल्प झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच तालुक्यातील ८० हजार पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे पशुधन वाचवायचे कसे असा प्रश्न पशुपालकांना सतावू लागला आहे. परंतु असे असले तरी जनावरांसाठी चारा छावण्यांसह अन्य विविध उपाययोजना करण्याबाबत प्रशासन पातळीवर कोणत्याही हालचाली दिसत नसून उदासीनता आहे. लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
वैजापूर तालुक्यात एकूण ७९ हजार १६३ जनावरे आहेत. यामध्ये १७ हजार १६३ लहान व ६२ हजार मोठ्या जनावरांचा समावेश आहे. मोठ्या जनावरांना प्रतिदिन ३७२ मेट्रिक टन व लहान जनावरांना प्रतिदिन ५१ मेट्रिक टन असा एकूण ४२३ मेट्रिक टन चारा दररोज लागतो. महिन्याकाठी या ७९ हजार १६३ जनावरांना १२ हजार ७०५ मेट्रिक टन चारा दररोज लागतो. सद्यस्थितीत कोरड्या चा-याबरोबरच हिरव्या चा-याचे भाव चांगलेच वधारले आहेत. चा-याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने पशुधन विक्रीसाठी बाजारात चालले आहे.
मुळातच खरीप व रब्बी हंगाम शेतक-यांच्या हातातून गेल्याने स्वतः च जगायचं कसं? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांना पोसायला शेतक-यांमध्ये ताकद उरली नाही. तालुक्यातील जनावरांना छावण्या उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी विविध राजकीय पक्ष व संघटनांनाकडून होत असतांना प्रशासन या बाबीकडे सोयीस्कपणे दुर्लक्ष करीत आहे. चारा नसल्याने बाहेरच्या जिल्ह्यातून चारा विक्रीसाठी वैजापूर येथे येत आहेत.
चारा नेमका किती मेट्रिक टन उपलब्ध आहे? याची आकडेवारी संबंधित अधिका-यांकडे नाही. त्यामुळे हा चारा फक्त 'कागदोपञीच' उपलब्ध असल्याची शंका निर्माण होण्यास वाव आहे. दरम्यान गेल्या हंगामात दोन - तीन मोठ्या पावसांचा अपवाद वगळता पावसाळा अत्यल्प राहिला. परिणामी पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चा-याचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यामुळे नागरिकांना पशुधन वाचविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
कडबाही कडाडला
सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चाराटंचाई निर्माण झाली आहे. केवळ कार्यालयात बसून कागदावर आकडेमोड करणाऱ्या अधिका-यांना दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही. प्रत्यक्षात ग्रामीण भागात जावून दौरा केल्यास पाणी व चाराटंचाईची दाहकता जाणून येईल. कोरड्या चा-याबरोबरच हिरव्या चा-याचे भावही चांगलेच वधारले आहे. कडब्याचे भावही कडाडले आहेत.
अधिकाऱ्यांची ढकलाढकली
दरम्यान तालुक्यात जनावरांना चा-याची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत असतांना तालुका कृषी अधिकारी व पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांमध्ये कोणताही ताळमेळ नसल्याचे समोर आले आहे. या दोघाही महाशयांकडे चाऱ्याची आकडेवारी उपलब्ध नाही. सदर प्रतिनिधीने वारंवार संपर्क करूनही या दोघांकडून उपलब्ध चाऱ्याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. तालुका कृषी अधिकारी म्हणतात तो पशुधन विभागाचा विषय आहे तर दुसरीकडे तो विषय कृषी विभागाचा असल्याचे पशुधन विकास अधिकारी सांगतात. या ढकलाढकलीमध्ये मात्र चाऱ्याचे नियोजन व उपलब्ध आकडेवारी नेमकी कुणाकडे आहे? हे मात्र कळायला मार्ग नाही. या दोन्हीही विभागात समन्वय नसल्याने उपलब्ध चाऱ्याच्या आकडेवारीबाबत एकमेकांवर टोलवाटोलवी सुरु आहे. त्यामुळे उपलब्ध चा-याची नेमकी आकडेवारी कळू शकली नाही.
उपलब्ध चाऱ्याबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. संबंधित माहिती पशुधन विकास अधिकारी कार्यालयात मिळेल. ही माहिती त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. आमचा त्या विषयाशी संबंध नाही.
- व्यंकट ठक्के, तालुका कृषी अधिकारी, वैजापूर
आमच्याकडे फक्त तालुक्यातील जनावरांची संख्या आहे. माझ्याकडे उपलब्ध चाऱ्याची माहिती नाही. ती माहिती तुम्हाला तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून मिळेल. चाऱ्याशी आमचा काहीही संबंध नसतो.
- सोमनाथ आंबे, पशुधन विकास अधिकारी, वैजापूर
छाया स्त्रोत - गुगल