Suicide Attempt | 'त्यांना' भेटण्यापासून रोखले अन् 'ह्यांनी' कार्यालयातच विष घेतले

0

वैजापूर तहसीलमधील घटना



 

शेतरस्त्याच्या प्रकरणावरून एका ६५ वर्षीय वृद्धाने वैजापूर येथील तहसीलदारांच्या दालनाबाहेरच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना १० एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान घटनेनंतर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वृद्धास तत्काळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छञपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


 

.

आसाराम गायकवाड 



        आसाराम देवराम गायकवाड (६५ रा. पानवी बु. ता.वैजापूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आसाराम गायकवाड हे वैजापूर तालुक्यातील पानवी (बु) येथील रहिवासी असून त्यांचे याच शिवारात शेत आहे. शेतरस्त्याच्या संदर्भात त्यांचे प्रकरण तहसीलदारांकडे सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शेतरस्ता मोकळा करून द्यावा. या मागणीसाठी त्यांनी यापूर्वी उपोषणही केले होते. १० एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते तहसीलदार सुनील सावंत यांना भेटण्यासाठी जात असताना दालनाबाहेर शिपायाने त्यांना अडविले.



 तहसीलदारांकडे अभ्यंगतांची गर्दी असल्याने शिपायाने त्यांना थोडावेळ थांबण्यास सांगितले. परंतु त्यांना तहसीलदारांकडे जाऊ न दिल्यामुळे त्यांचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरात त्यांनी सोबत आणलेले विषारी औषध तेथेच प्राशन केले. एकापाठोपाठ औषधांची तीन झाकण प्राशन केल्याने ते अत्यवस्थ झाले. त्यामुळे तहसील कार्यालयात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती तहसीलदारांसह अन्य कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी गायकवाड यांना वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.





आसाराम गायकवाड यांचे शेतरस्ता प्रकरण यापूर्वीच निकाली काढण्यात आले आहेत. ही घटना घडली तेव्हा माझ्याकडे अभ्यंगतांची गर्दी होती. दालनाबाहेर काय झाले? मला काहीच माहिती नाही. आरडाओरड झाल्यानंतर मला हा प्रकार समजताच मी बाहेर आलो अन् त्यांना तात्काळ दवाखान्यात हलविले. त्यांनी विषारी औषध प्राशन करण्याचे कारण मला समजले नाही.

 - सुनील सावंत, तहसीलदार, वैजापूर 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top