छ. संभाजीनगर येथील दुर्देवी घटना
छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील कापड दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. ही घटना ३ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या घडली आहे. दरम्यान मृतांमध्ये अब्दुल अजीम यांच्या पत्नीसह दोन मुले, दोन सुना व दोन नातवांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कपड्याचे दुकान छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला होते. या दूकानाला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याने ७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे.
चार्जिंगला लावलेल्या मोपेडमुळे आग
छावणीतील दाना बाजार येथे घराला आग लागल्याची घटना ही शॉर्टसर्किटने झाल्याचे बोलले जात आहे. घरमालक शेख असलम यांचे टेलरिंगच्या दुकानातून त्यांनी त्यांची इलेक्ट्रिक मोपेड चार्जिंगसाठी लावली होती, त्यामुळेच शॉर्टसर्किट झाल्याचे नागरिकांनी सांगितले. ही तीन मजली इमारत असून, ग्राउंड फ्लोअरला शेख असलम यांचे किंग स्टाईल नावाचे टेलरिंगचे दुकान आहे. पहिल्या मजल्यावर ते त्यांची पत्नी व मुलासह राहतात. दुसरा आणि तिसऱ्या मजल्यावर त्यांनी भाडेकरू ठेवलेले आहेत. दुसऱ्या मजल्यावर हमीदा बेगम अब्दुल अजीम यांचे कुटुंब तर तिसऱ्या मजल्यावर खुसरो व त्यांची पत्नी हे कुटुंब राहते. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे समजताच घरमालक शेख असलम व त्यांचे कुटुंब सुखरूप बाहेर पडले. मात्र हमीदा बेगम अब्दुल अजीम यांच्या कुटुंबातील पाचजण श्वास गुदमरून तर दोघेजण होळपळून मरण पावले. वसीम शेख अब्दुल अजीम आणि शेख सोहेल अब्दुल अजीम हे छावणी बाजारातील म्हशीचे दूध काढून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. इमारतीतील सर्वात वरच्या भागात राहणारे खुसरो व त्यांची पत्नी यांनी शेजारच्या घराच्या गच्चीवर उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला.
मृतांची नावे अशी -
असीम वसीम शेख ( 3 ), परी वसीम शेख (2), वसीम शेख अब्दुल अजीम (30), तन्वीर वसीम शेख (23), हमीदा बेगम अब्दुल अजीम (50), शेख सोहेल अब्दुल अजीम (35), रेश्मा शेख सोहेल शेख ( 22)