गावकरी झाले संतप्त
शासनाचे वाळूधोरण ठेकेदाराने धाब्यावर बसवून वाहनांची 'हेराफेरी' सुरू असल्याने वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव येथील वाळू डेपो बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून हा डेपो बंद आहे. दरम्यान संबधित ठेकेदार वाळू डेपोतून आॅनलाईन प्रक्रिया केलेली वाहने भरून न देता दुसरीच वाहने भरून देत स्वतःची 'चांदी' करून घेत असल्याचा प्रकार समोर आल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी डेपो बंद पाडल्याचे बोलले जात आहे.
वैजापूर तालुक्यातील पुरणगाव, भालगाव,नागमठाण व अव्वलगाव येथील गोदावरी नदीतील वाळूपट्ट्यांतील वाळूचा महसूल प्रशासनाने लिलाव केला आला आहे. या चारही वाळूपट्ट्यांतील एक लाख ३८ हजार ७११ मेट्रिक टन वाळूसाठा उपलब्ध आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एकाने १४१ रुपये प्रति टनाने हा वाळू पट्टा घेतलेला आहे. मुख्य वाळू डेपो हा वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव येथे करण्यात आलेला आहे. अन्य चारही वाळूपट्ट्यांतील वाळू डागपिंपळगाव येथे आणून टाकली जाते.
परंतु गेल्या काही दिवसांपासून या वाळू डेपोत ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. त्यामुळे या डेपोचा सामान्य नागरिकांपेक्षा ठेकेदाराच्याच पथ्यावर ही बाब पडताना दिसत आहे. गोदापात्रातील वाळू उचलण्याची परवानगी दिल्यानंतर संबधित ठेकेदार ट्रॅक्टर व टिप्पर वाहनांऐवजी हायवांसारख्या वाहनांतून नियमबाह्य वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याने हा डेपो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परिणामी यात ठेकेदाराचेच 'चांगभलं' होत आहे. ही धुळफेक जेव्हा डागपिंपळगाव येथील गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर वाळू डेपो बंद पाडण्यात आला.
ठेकेदार मनमानी पद्धतीने वाळूची खुलेआमपणे उचल करीत असताना महसूल अधिकारी हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून आहेत. एरवी गोदापात्रात लहानसहान वाहने पकडून सळो की पळो करून सोडणाऱ्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या 'भर अब्दुल्ला गुड थैली में' कृतीकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे दिसत आहेत. खुलेआम नियमांची पायमल्ली सुरू असताना अधिकारी गप्प का आहेत? हे मात्र कळायला मार्ग नाही.
माफियांची वाहने डेपोवर
शासनाने सामान्यांसाठी सहज व स्वस्तात वाळू उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा वाळू डेपो सुरू केला. परंतु शासनाच्या या उदात्त हेतूलाच सुरूंग लागल्याचे दिसत आहे. आॅनलाईन केलेली वाहने डेपोतून भरण्याऐवजी वाळूमाफियांची वाहने भरून देऊन ठेकेदार आपले उखळ पांढरे करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. त्यामुळेच गावकऱ्यांनी हा डेपो बंद पाडला. त्यामुळे बुधवारपासून हा डेपो बंद आहे.
अगोदर चौकशी करा
डाकपिंपळगावचा वाळू डेपो बंद पाडला खरा. परंतु काही दिवसांनंतर हा डेपो पुन्हा चालू होईल. परंतु डेपो चालू करण्यापूर्वी संबधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या हेराफेरीबाबत चौकशी करून कारवाई करण्याची गरज असल्याची रास्त अपेक्षा गावकऱ्यांची आहे.