जातेगाव येथील घटना
तलवारीचा धाक दाखवून वसुली अधिकाऱ्याला लुटणाऱ्या एकाला पोलिसांनी मंगळवारी त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. निखिल उर्फ समीर उर्फ सम्या रामेश्वर सातुरे ( रा. जातेगाव ता. वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे.
निखिल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. |
क्रेडिट अॅक्सिस ग्रामीण लि.या संस्थेची वैजापूर येथे शाखा आहे.या संस्थेचे व्यवस्थापक प्रविण आंबेडकर हे वसुली करण्यासाठी तालुक्यातील जातेगाव येथे ४ मार्च रोजी गेले होते. कर्जदाराकडून कर्ज वसूल करून मोटारसायकलवर सायंकाळी ५ वाजता ते परत येत होते.त्यावेळी निखील सातुरे या युवकाने त्यांची मोटारसायकल अडवून त्यांना तलवारीचा धाक दाखवून त्याने त्यांची बॅग बळजबरीने हिसकावून नेली.
या बॅगेमध्ये ५८ हजार १९० रूपये व १२ हजार रुपये किंमतीचा टॅब असे एकूण ७० हजार १९० रुपये किंमतीचा ऐवज होता. दरम्यान तेव्हापासून आरोपी फरार होता. मंगळवारी तो गावात आल्याची माहिती वीरगाव पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. तपास वीरगाव पोलिस करीत आहेत.