Court Order | शिक्षकाच्या 'श्रीमुखात' भडकावली; एक वर्षाचा कारावास

0

गोयगाव येथे घडली होती घटना 



 

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकास मारहाण करणाऱ्या वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील आरोपीस येथील  सहायक सत्र न्यायालयाने  एक वर्षाच्या सश्रम कारावासासह  एक हजार रुपये दंडाची शिक्षा  सुनावली आहे. भगवान सोपान सोनवणे (४५ रा. गोयगाव ता. वैजापूर ) असे शिक्षा सुनवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 







याबाबत अधिक माहिती अशी की,  योगेश देवराम गवळी (रा. शिवशंकरनगर , वैजापूर) हे वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.  २९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास ते शाळेत मुलांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरत होते. नेमके याचवेळी घटनेतील आरोपी  भगवान सोपान सोनवणे हा तेथे आला व फिर्यादीस म्हणाला की, "तुम्ही माझ्या मुलाला शाळेत का येऊ देत नाही ?" असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करू लागला. 



दरम्यान त्यांनी "शासनाच्या नियमानुसार पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत हजर ठेवता येत नाही" असे आरोपीस समजावून सांगत असतांना भगवान यास राग आला. त्याने योगेश गवळी यांच्या  हातात असलेले शिष्यवृत्तीचे अर्ज फेकून दिले व त्यांची गच्ची धरून श्रीमुखात भडकावली तर मानेवर देखील चापटेने मारून मुक्का मार दिला तसेच चष्म्याची काच फोडून गचांडी धरून शर्ट फाडून म्हणाला की, "तू शाळेत मुलांना कसा शिकवतो व शाळेत कसा येतो ? तुझे हात पाय तोडून टाकीन" असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. 



याप्रकरणी शिक्षक योगेश गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अंमलदार विजय जाधव यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले होते. 



प्रकरणातील फिर्याद, साक्षीपुरावा व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जी. सी. मंझा यांनी केलेला मुद्देसुद युक्तीवाद ग्राह्य धरून येथील सहायक सत्र न्यायाधीश एस.के. उपाध्याय यांनी आरोपीस कलम ३५३ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व पाचशे रूपये दंड व  कलम ३३२ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा  सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जी. सी. मंझा यांनी कामकाज पाहिले.

छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top