२० दिवसांपूर्वी 'नांमका'ने दिले पत्र
वैजापूर व गंगापूर या दुष्काळग्रस्त तालुक्यांसह कोपरगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे २०२३-२४ या वर्षासाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून एक हजार ४९९ दशलक्ष घनफूट आवर्तन तात्काळ सोडावे. अशी मागणी येथील नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाने छत्रपती संभाजीनगर येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) अधिक्षक अभियंता तथा प्रशासकाकडे केली आहे. याबाबत 'नांमका'ने एक एप्रिल रोजीच पत्र पाठवले आहे. परंतु वीस दिवस उलटूनही याबाबत प्रशासकिय स्तरावर कुठलीही हालचाल दिसून येत नाही. दुसरीकडे या तिन्ही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत असल्याने नागरिक पाटबंधारे विभागाबाबत रोष व्यक्त करीत आहेत. नाशिक पाटबंधारे विभागाने १४९९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाच्या नावावर पळविल्याचा आरोप होत आहे.
नांदूर मधमेश्वर जलदगती कालवा |
नांदूर मधमेवर जलदगती कालव्यातून पाणी सोडण्याबाबत यापूर्वीही शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्यासह कोपरगाव व गंगापूरच्या आमदारांनी पाटबंधारे विभागाला पत्र दिलेले आहे. विशेष म्हणजे २०२३-२४ या वर्षांकरिता छत्रपती संभाजीनगर येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नाशिक विभागाकडे कालव्याच्या आवर्तनाकरीता ४५५९ दशलक्ष घनफूट म्हणजेच १२९.१२ दलघमी पाण्याची मागणी केलेली असतांना नाशिक विभागाने ३०६० दशलक्ष घनफूट म्हणजेच ८६.६६ दलघमी एवढेच पाणी उपलब्ध करुन दिले आहे.
त्यामुळे वैजापूरसह गंगापूर व कोपरगाव तालुक्याच्या हक्काचे पाणी नाशिकने पळविले असून याबाबत लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज असल्याची अपेक्षा लाभधारक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. तसेच मुकणे धरणावरील शासनमान्य पिण्याचे आरक्षण हे वैजापूर व गंगापूर या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या पाण्यावर न घेता नाशिक विभागाकरीता असलेल्या २०४ दलघमी पाण्यावर घ्यावे. इगतपुरी नगरपरिषद व घोटी ग्रामपंचायतीसाठी भावली धरणावर असलेले आरक्षण रद्द करावे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुकणे व भावली धरणातून पिण्यासाठी केलेले आरक्षण त्वरित रद्द करावे.
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केल्याशिवाय या चारही धरणावर कोणतेही आरक्षण टाकण्यात नये. रब्बी हंगामासाठी सद्यस्थितीत वहनव्यय नदीपात्र ओले असल्यामुळे किमान १५ ते २० टक्केच घेण्यात यावे, पाण्याची उपलब्धता काढतांना बाष्पीभवन व शासनमान्य आरक्षण वगळून उर्वरित पाण्याकरिता नदीचा वहनव्यय ग्राह्य धरावा. तसेच वाकी व भाम या प्रकल्पासाठी नियोजनात स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाणीवापर १०० दशलक्ष घनफूट इतका गृहित धरावा. अशा सुचना पाटबंधारे विभागाने केल्या आहेत.
सहा दिवसांपुरताच जलसाठा
वैजापूर व गंगापूर तालुके अवर्षणप्रवण म्हणून ओळखले जातात. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे यंदा दोन्हीही तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेषतः वैजापूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सध्यस्थितीत सहा दिवस पुरेल एवढाच जलसाठा घोयगाव साठवण तलावात शिल्लक आहे. १० मे रोजी नाशिक पाटबंधारे विभागाकडून आवर्तन पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ६० टँकरची मागणी केली आहे.
तिन्हीही तालुक्यांची तहान भागेल
वैजापूर शहर पाणीटंचाईने ग्रासलेले असतानाच ग्रामीण भागाचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे आवर्तन सोडल्यास वैजापूर तालुक्यातील 'नांमका' लाभक्षेत्रातील जवळपास ४५ व गंगापूर तालुक्यातील ४० व कोपरगाव तालुक्यातील जवळपास २० गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागून सिंचनाही प्रश्न सुटेल.
नागरी समस्यांकडे डोळेझाक
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या धामधुमीत टंचाई समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरासह ग्रामीण भागात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट तर झालाच. परंतु जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. असे असतानाही अधिकाऱ्यांना या मुलभूत सुविधांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. निवडणुकीच्या नावाखाली अधिकारी लक्ष न देता केवळ पाट्या टाकण्याचे काम सुरू आहे. निवडणूक जरी असली तरी नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करा. असा कोणताही शासन निर्णय शासनाने पारित केलेला नाही. याचे भानही प्रशासनातील अधिकाऱ्यांना असायला हवे.