मरणाने केली सुटका,जगण्याने छळले होते
'
'ती' नव्वदीत एकटंच आयुष्य जगत होती. सांभाळायला कुणी नाही. त्यामुळे ती निराधारच होती. निराधार वृध्देचा सांभाळ केला अन् निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारही केले. एवढेच नव्हे तर 'ती' हिंदू आणि 'ते' मुस्लिम असूनही जातीयता कुठेही आड न येता तेच तिचे खांदेकरी झाले आणि पार्थिवाला भडाग्नी त्यांनीच दिला. हे उदाहरण म्हणजे हिंदू - मुस्लिम जातीयतेवर आगपाखड करणाऱ्यांना ही मोठी चपराक म्हणावी लागेल. दरम्यान 'जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते' या कवी सुरेश भटांच्या ओळीही तंतोतंत येथे लागू पडतात.
छबाबाई शेलार यांच्या निधनानंतर मुस्लिम बांधव तिचे खांदेकरी झाले. |
त्याचे असे झाले की, वैजापूर तालुक्यातील तिडी येथील निराधार छबाबाई मुरलीधर शेलार (वय ९० वर्षे) यांचे मंगळवारी सकाळी १० वाजता निधन झाले. त्यांना नातेवाईक नसल्याने त्यांची तिरडी स्मशानभूमीत नेण्यापासून ते पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत मुस्लिम समाजाच्या नागरिकांनीच पुढाकार घेतला. छबाबाई गावात एकट्याच राहत होत्या. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे अन्य नातेवाईक मात्र अंत्यविधीला हजर राहू शकले नाहीत.
अंबाबाई शेलार |
त्यामुळे मुस्लिम बांधव व अन्य गावकरी खांदेकरी म्हणून धावले. मंगळवारी हिंदू धर्मियांचा गुढीपाडवा सण होता तर दुसरीकडे मुस्लिमांचा रमजान महिना सुरू आहे. अशा परिस्थितीत धर्म, जात न बघता केवळ मानवता हा दृष्टीकोन ठेवून वृध्देच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व पुढे सरसावले अन् गरीब व निराधार महिलेला अखेरचा निरोप दिला.
माणुसकीला 'जात' नसते
सध्यस्थितीत जातीयता टोकाला पोहोचली असून सामाजिक बांधिलकी नावाचा प्रकार समाजातून हद्दपार झाल्यागत आहे. जातीय तेढ, दंगेधोपे होऊन हिंदू - मुस्लिम समाज दुभंगून मोठी दरी निर्माण झाली आहे. राजकारण्यांकडून या बाबीला खतपाणी घातले जात असल्याने ही दरी कमी होण्याऐवजी ती वाढत चालली आहे. शेजापाजाऱ्यांना एकमेकांशी देणेघेणे उरले नाही. तिथे गावातील कोण मरते अन् कोण जगते. याकडे बघायला कुणालाही वेळ नाही. अशा परिस्थितीत या वृध्देचे उदाहरण म्हणजे वाळवंटात हिरवळ आल्यासारखे म्हणावे लागेल. माणुसकीला 'जात' नसते. हेच येथे अधोरेखित होते. बाकी सर्व मिथ्या आहे.
सामाजिक एकोप्याचे दर्शन
सामाजिक कार्यकर्ते ॲड.सुभान पटेल,आयुब पटेल,नासीर पटेल,सरपंच सुदाम आहेर,पोलीस पाटील भाऊसाहेब डुकरे, सोपान कोकाटे व गावातील सर्व समाजातील नागरिकांनी वृध्देच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे येऊन सामाजिक एकोप्याने दर्शन घडविले.
मानवता जिवंतच.!
जन्म आणि मृत्यू या दोहोतील अंतर म्हणजे आयुष्य. मृत्यू अटळ आहे. नातेवाईक असो अथवा नसो. समाजात आजही अशी काही माणसं आहेत की, निराधारांच्या सांभाळापासून त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा सांभाळ करतात. एकीकडे सामाजिक दरी वाढत चालली असली तरी दुसरीकडे मानवता जपणारी उदाहरणेही आहेतच.