Murder Case | पैशांच्या वादातून प्रियकरानेच केला 'तिचा' खून, मारेकरी जेरबंद

0

शिऊर येथील खूनप्रकरण 



वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील दहा दिवसांपासून बेपत्ता  असलेल्या महिलेचा खून करून मृतदेह गोणीत बांधून फेकून दिल्याची घटना  २७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वजेच्या सुमारास उघडकीस आली होती. शनिवारी रात्री शिऊर पोलिसांना भटाणा धरणालगत महिलेचा मृतदेह मिळून आल्याने  काही तासांतच पोलिसांनी महिलेचा मारेकरी समाधान गायकवाड (२६) व अजय शिंदे (२२) दोघे रा.शिऊर यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान पैशांच्या वादातूनच प्रियकराने तिचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.


 





 सविता अरुण धनेश्वर (२७ रा. शिऊर) असे घटनेतील मृत महिलेचे नाव आहे.  सविता धनेश्वर ही पती व त्यांच्या चार मुलींसह शिऊर येथे रहिवासास होती. ती १८ एप्रिल पासून बेपत्ता होती. याबाबत नातलगांनी १९ एप्रिल रोजी शिऊर पोलीस ठाण्यात सविता बेपत्ता झाल्याची नोंद देखील केली होती. परंतु नऊ दिवस उलटल्यानंतरही  पोलिसांना तिचा तपास लागत नव्हता. अखेर शनिवारी सायंकाळी भटाणा धरणाच्या पायथ्याशी झुडुपात  गोणीमध्ये  प्रेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे, फौजदार चेतन ओगले, बीट जमादार त्रिलोकचंद पवार, राहुल थोरात आदींनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. चौकशी दरम्यान मृतदेह बेपत्ता सविता धनेश्वर हिचाच असल्याची पोलिसांना खात्री पटली. या प्रकरणी  शिऊर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 



मृत सविता धनेश्वर 



अजयला कोपरगावातून उचलले


 त्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवत समाधान गायकवाड याचे मृत सविताशी विवाहबाह्य संबंध असल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे समाधान यास पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने काहीही सांगितले नाही. त्यानंतर त्याचा मित्र अजय शिंदे हा फरार होता. त्यास कोपरगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. 


पैशांच्या कारणावरूनच खून 


सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच 'त्याने १९ एप्रिल रोजी माझ्या घरी समाधान गायकवाड व सविता धनेश्वर या दोघांचे पैशांच्या कारणावरून वाद होऊन समाधानने  तिचा ओडणीने गळा आवळून खून केला'. समाधान याचे गेल्या चार वर्षांपासून सविताबरोबर विवाहबाह्य संबंध होते व ते खोलीवर नेहमी भेटत असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. खून केल्यानंतर त्याने मला या घटनेची माहिती फोनवरून देत मदतीसाठी बोलावले. नंतर मयत महिलेचे प्रेत पोत्यात घालून मोटरसायकलवरून नेत ते भटाणा धरण्याच्या कडेला फेकून दिल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top