सेविकांनी कार्यालयात घातला गोंधळ
अंगणवाडी सेविकांना मानधन कमी अन् कामे जास्त अशी अवस्था असतानाच शासनाकडून वैजापूर तालुक्यातील अंगणवाड्यांसाठी आलेले गरोदर माता कीटसह अन्य साहित्य थेट पोहोच न करता एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात पोहोच केल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. हे साहित्य अंगणवाड्यांत घेऊन जाण्यासाठी सेविकांनी असमर्थता दर्शवून साहित्य थेट पोहोच करा. अशी मागणी केली. एकंदरीत एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात हे चित्र पाहून 'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' या काव्यपंक्तीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
अंगणवाड्यांसाठी दिले जाणारे गरोदर माता कीट थेट पोहोच न करता वैजापूर येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात सेविकांना देण्यात आले. त्यामुळे सेविकांची फजिती झाली. |
याबाबत अधिक माहिती अशी की, शासनाकडून तालुक्यातील अंगणवाड्यांसाठी गरोदर कीट आल्या असून या कीट पुरवठादाराने थेट अंगणवाड्यांमध्ये पोहोच न करता येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात उतरविण्यात आले. त्यानंतर अंगणवाडी सेविकांना तालुकास्तरावर बोलावून त्यांच्या माथी हे ओझे मारण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला खरा. परंतु अंगणवाडी शिक्षक भारतीच्या जिल्हाध्यक्षा माया म्हस्के, गीतांजली पहाडे व अन्य बहुतांश अंगणवाडी सेविकांनी हे साहित्य घेऊन जाण्यास विरोध दर्शविला.
सध्या सुर्य आग ओकत असताना अशा परिस्थितीत हे साहित्य अंगणवाडीत घेऊन जायचे कसे? असा प्रश्न उपस्थित करून मोठा गोंधळ घातला. यातील बहुतांश सेविकांची लहान मुले आहेत. सोबत मुले व त्यातच हे साहित्य घेऊन जायचे कसे? असा प्रश्न त्यांना पडला होता. सेविका टाहो फोडत असताना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ नव्हता. दरम्यान यासंदर्भात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता 'मी सध्या कामात आहे, तुम्ही नंतर येता का? असे सांगून बोलण्यास टाळाटाळ केली.
बॅनरपोटी ३०० रुपयांची वसुली
ज्यांनी गरोदर कीटसह साहित्य पोहोच केले. त्यांनी सोबत अंगणवाड्यांमध्ये लावण्यासाठी बॅनरही आणले होते. ते बॅनर सेविकांना देऊन प्रत्येकी ३०० रुपये संबधितांनी सेविकांना मागितले असता सेविकांनी देण्यास विरोध केला. केवळ सोबत पावतीबुक आणून पैसे हडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सेविकांनी केला. विशेष म्हणजे बॅनर घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना अथवा कोणतेही अधिकृत पत्र नसतानाही हा घाट घातला गेला. त्यामुळे मोठे वादंग उठले आहे.
शासनाने गरोदर कीट थेट अंगणवाड्यांमध्ये पोहोच करायला पाहिजे होते. किटचे वजन पाहता सेविकांना खेड्यागावात घेऊन जाणे अवघड आहे. वाढते तापमान, सोबत असलेली सेविकांची मुले पाहता या बाबींचा विचार करून कीट पोहोच केल्या पाहिजेत. याशिवाय बॅनरपोटी ३०० रुपये वसूल करणे अयोग्य आहे. याबाबत आम्हाला कुणाची लेखी सूचना अथवा काहीही कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे सेविकांनी बॅनर का घ्यायचे? ही मनमानी आहे.
- माया म्हस्के, अंगणवाडी शिक्षक भारती, जिल्हाध्यक्षा