दोन सावत्र मुलाचांही समावेश
वैजापूर जमिनीच्या वादातून वृद्ध पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पतीसह दोन सावत्र मुले व अन्य एक अशा चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान वैजापूर येथील न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली होती.
कारभारी किसन गवळी (८०), भारत कारभारी गवळी (४७), अतुल कारभारी गवळी (२७) सर्व रा. घायगाव ता. वैजापूर व रघुनाथ जगन्नाथ सरोवर रा.गारज ता. वैजापूर असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील मृत केशरबाई गवळी ही कारभारी गवळी याची पत्नी होती. कारभारी गवळी याने केशरबाई हिच्याशी फारकत घेतल्याने ४० वर्षांपूर्वीपासून त्या तालुक्यातील बोरसर येथील त्यांच्या मुलीकडे राहत होत्या. दरम्यान कारभारी याने दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पत्नीपासून त्याला भारत व अतुल ही दोन मुले आहेत.पोटगीपोटी केशरबाई यांना ४ एकर ३३ गुंठे शेती मिळाली. परंतु त्यांना शेतीचा ताबा मिळाला नव्हता.
सदरील प्रकरण वैजापूर येथील न्यायप्रविष्ट होते. या खटल्याच्या सुनावणीसाठी केशरबाई या नातू किसन तांबे (मुलीचा मुलगा) याच्यासोबत ३ ऑक्टोबर २०२० रोजी न्यायालयात आल्या होत्या. खटल्यासाठी वेळ असल्याने त्या न्यायालयाबाहेर एका खडीच्या गंजावर बसल्या होत्या. नेमके याचवेळी त्या ठिकाणी त्यांचा पती कारभारी हा चाकू घेऊन तिथे आला. यावेळी केशरबाईचा नातू किसन तांबे याला अतुल व जगन्नाथ यांनी तर रघुनाथ याने केशरबाईला पकडले व काही समजण्याच्या आत कारभारीने पत्नीवर चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात त्या जागीच गतप्राण झाल्या. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी फिर्यादी किसन तांबे, सय्यद मन्सूर अली फिरोज अली, हवालदार धनंजय भावे, डॉ. प्रियंका जाधव यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम.ए. यांनी चौघा आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महीने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे तर आरोपीस कलम १२० (ब) भादवी व ४/२५ भा.ह.का. या कलमातून निर्दोष मुक्ताता केली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. नानासाहेब जगताप यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी विठ्ठल जाधव सहायक पोलिस निरीक्षकांनी त्यांना सहकार्य केले.