अनेक मुलींनी सोडले हाॅस्टेल
छत्रपती संभाजीनगर शहरातील वेदांतनगर भागातील मुलींच्या हॉस्टेलमध्ये पैशावरुन हॉस्टेल चालकाने मध्यरात्री मुलींच्या रुमचा दरवाजा वाजवत गोंधळ घातला. या प्रकाराने मुली घाबरुन गेल्या. हा गोंधळ वाढल्यानंतर पोलिसाना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल होण्याआधीच हॉस्टेलचालक पसार झाला. ही घटना रविवारी रात्री घडली. भितीमुळे सोमवारी अनेक पालक मुलींना घेऊन गेले आहेत. याप्रकरणी मुलींनी तक्रार देण्यास नकार दिल्याची माहीती पोलिस सूत्रांनी दिली.
वेदांतनगर भागात मातोश्री नावाने मुलीचे हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमध्ये ५५ ते ६० मुली राहतात. लातूर येथील एक व्यक्ती हे हॉस्टेल चालवतो. रविवारी रात्री एका मुलीचे हॉस्टेलची फिस बाकी असल्याने हॉस्टेल चालकाने रात्री दोन वाजता तिच्या रुमचा दरवाजा वाजवला. मध्यरात्री अचानक हा प्रकार घडल्याने मुली घाबरुन गेल्या. हॉस्टेलमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान हा आवाज एकूण परिसरातील नागरीकांनी पोलिसांना हा प्रकार कळविला. वेदांतनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.या मुलींना आणि हॉस्टेल चालकाला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मुलींनी तक्रार देण्यास नकार दिला.
पोलिसांनी मुलींच्या पालकांना बोलावून घेत ही माहीती दिली. अन्य पालकांना देखील हा प्रकार कळाला. पोलिसांनी समज देऊन सोडलेल्या हॉस्टेलचालकाने नंतर पलायन केले. दुपारी पोलिसांनी त्याच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावले. दरम्यान हॉस्टेलमध्ये राहणे सुरक्षीत वाटत नसल्याने अनेक पालक मुलींना घेऊन गेले. सायंकाळी घटनास्थाळी पोलिस निरीक्षक प्रविणा यादव, पीएसआय मुंडे यांनी पुन्हा भेट दिली. उर्वरीत मुलीं सध्या हॉस्टेलमध्ये राहत असून पोलिसांनी त्यांच्या जेवणाची तसेच सुरक्षिततेची व्यवस्था केली असल्याची पोलिसांनी दिली.