अंचलगाव जळीतकांड प्रकरण
घरगुती वादातून जावेने घरातील पणतीवर पेट्रोल फेकल्याने भडका होऊन पतीसह पत्नी व दोन चिमुकले असे चौघेजण होरपळल्याची घटना २४ मार्च रोजी वैजापूर तालुक्यातील अंचलगाव येथे घडली होती. या घटनेत आईसह दोन चिमुकले अशा तिघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान होरपळून गंभीर भाजलेल्या पतीनेही ७ एप्रिल रोजी उपचारादरम्यान या जगाचा निरोप घेतला. या घटनेत होरपळून भाजल्याने अख्खं कुटुंबच संपल. त्यामुळे अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे.
अप्पासाहेब आसाराम कोकाटे (३५ रा. अंचलगाव ) असे मृताचे नाव आहे. यापूर्वी पत्नी कोमल, कल्याणी व काव्या या दोन मुलींचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, कौटुंबिक वादातून जावेने घरामध्ये फेकलेल्या पेट्रोलच्या भडक्याने एकाच घरातील चौघेजण भाजल्याची घटना होळीच्या दिवशी (२४ मार्च) रोजी वैजापूर तालुक्यातील अंचलगाव येथे घडली होती. या घटनेत पती अप्पासाहेब आसाराम कोकाटे (३५),पत्नी कोमल अप्पासाहेब कोकाटे(२६) हे दांपत्य भाजून गंभीर जखमी झाले होते तर मुलगी कल्याणी कोकाटे (वय ५ वर्षे ) व काव्या कोकाटे (वय ५ महिने) या दोघींचाही होरपळल्या होत्या. यात काव्याचा त्याच दिवशी तर कल्याणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
घटनेनंतर कोकाटे दांपत्यास उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान भाजलेल्या कोमलने शुध्दीवर आल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जवाबात जाऊबाई कल्पना सोमनाथ कोकाटे हिच्याशी नळाचे पाणी भरण्यावरून वाद झाल्यानंतर तिनें रागाच्या भरात घराच्या खिडकीतून पेट्रोल फेकल्याने ते देव्हाऱ्यातील दिव्यावर पडून भडका झाल्याने घराला आग लागली. त्यात माझ्यासह पती व दोन मुली होरपळल्या. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला तर पती भाजून गंभीर जखमी झाला. असे सांगितले होते. त्यानुसार कल्पना कोकाटे या तिच्या जावेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान कोमल हिच्यावर २४ मार्चपासून घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना मंगळवारी २ एप्रिल रोजी तिने अखेरचा श्वास घेतला अन् गेल्या आठ दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज अयशस्वी ठरली. तिच्या मृत्यूनंतर बुधवारी सकाळी या प्रकरणात सासू व भाया सोमनाथ कोकाटे यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई करावी. या मागणीसाठी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसह मृतदेह थेट शिऊर पोलिस नेऊन दोन तास ठिय्या दिला होत. दरम्यान तिघांचा एकापाठोपाठ मृत्यू झाल्यानंतर गेल्या २४ मार्चपासून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेले अप्पासाहेब कोकाटे यांचीही ७ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास प्राणज्योत मालवली. या घटनेत चौघांचाही मृत्यू झाल्याने अख्खं कुटुंबच संपून गेले.