वीरगाव पोलिस ठाण्यातील घटना
दोनच दिवसांपूर्वी तलवाराचा धाक दाखवून एका पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले होते. परंतु या गुन्हेगाराने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ठाण्यातून पोबारा केला आहे. या घटनेमुळे वीरगाव पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीरगाव पोलिस ठाणे |
निखिल ऊर्फ समीर ऊर्फ सम्या रामेश्वर सातुरे (वय १९ वर्षे रा.जातेगाव ) असे या धूम ठोकलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, क्रेडिट अॅक्सिस ग्रामीण लि.या संस्थेची वैजापूर येथे शाखा आहे.या संस्थेचे व्यवस्थापक प्रविण आंबेडकर हे वसुली करण्यासाठी तालुक्यातील जातेगाव येथे ४ मार्च रोजी गेले होते. कर्जदाराकडून कर्ज वसूल करून मोटारसायकलवरून ते सायंकाळी ५ वाजता परत येत होते. त्यावेळी निखील सातुरे याने त्यांची मोटारसायकल अडवून त्यांना तलवारीचा धाक दाखवून त्याने त्यांची बॅग बळजबरीने हिसकावून नेली.
दोनच दिवसांपूर्वी निखिलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. |
या बॅगेमध्ये ५८ हजार १९० रूपये रोख व १२ हजार रुपये किंमतीचा टॅब असे एकूण ७० हजार १९० रुपये किंमतीचा ऐवज होता. दरम्यान तेव्हापासून आरोपी फरार होता. १६ एप्रिल रोजी तो गावात आल्याची माहिती वीरगाव पोलिसांनी मिळाली. त्यानुसार वीरगाव पोलिसांच्या पथकाने त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. दरम्यान १७ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास शौचास जाण्यासाठी पोलिसांनी निखिल याला लाॅकअपमधून बाहेर काढताच त्याने पोलिसांच्या हाताला हिसका देऊन ठाण्यातून धूम ठोकली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पोलिसांच्या हाती लागला नाही. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. तो उसाच्या शेतात पळून गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी निखिल सातुरे याच्याविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत वीरगाव ठाणेप्रमुख शंकर वाघमोडे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी 'मी नंतर काॅल करतो'असे सांगून बोलण्याचे टाळले.
'हाताची घडी, तोंडावर बोट'
दरम्यान ४ मार्च रोजी पतसंस्थेच्या अधिकाऱ्याला लुटल्यापासून निखिल हा फरार होता. त्यानंतर १६ एप्रिल रोजी तो पोलिसांच्या कसाबसा हाती लागला. एक दिवस ठाण्यात मुक्काम झाल्यानंतर तो पुन्हा दुसऱ्या दिवशी चकमा देऊन फरार झाला. तो सराईत गुन्हेगार असताना पोलिसांनी एवढा निष्काळजीपणा का केला? बाहेर काढताना पाहिजे तेवढी काळ्जी घेण्यात आली होती का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे वीरगाव पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ठाण्यातील अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी कुणीच काही बोलायला तयार नसून सर्वंच 'हाताची घडी, तोंडावर बोट' ठेवून आहेत.
अवैधधंदे बेफामपणे सुरू
गेल्या काही दिवसांपासून वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर बोकाळली असून घरफोड्यांसह चोऱ्या, लुटमार, दारू विक्री, जुगार अड्डे अशा अवैधधंद्यांनी उच्छाद मांडला आहे. याशिवाय अवैध वाळूतस्करी ही तर नित्याचीच बाब झाली आहे. ठाण्याच्या हद्दीत अवैधधंदे बेफामपणे सुरू असताना पोलिस यंत्रणा मुग गिळून गप्प का? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. हे सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणेची अलिखित तर परवानगी तर नाही ना? असा संशय घेण्यास वाव निर्माण झाला आहे.
'वरकमाई' मिळणाऱ्या मार्गावरच गस्त
ठाण्याच्या हद्दीतील जातेगाव शिवारातील शेतवस्तीवर राहणाऱ्या दोन महिलांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे शेतवस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. चोरटे महिलांना लक्ष्य करून शेतवस्त्यांवर धुमाकूळ घालत असताना पोलिसांची गस्त कुठे गेली? असाही प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पोलिस 'वरकमाई' होणाऱ्या मार्गावरच गस्त घालत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.