Fake Marriage | नवरी गेली अन् पावणेदोन लाखही; लग्नाळू तरुणाची आपबीती

0

नववधूसह पाच जणांविरुद्ध गुन्हा 

 


एखाद्या चित्रपटातील कथानक शोभावे अशी घटना घडली आहे. लग्नाळू मुलाने लग्न जुळविण्यासाठी पावणेदोन लाख रुपये दलालाच्या घशात घातले.. लग्नही पार पडले.. नववधू वराच्या घरी आली.. अन् रात्री सर्व झोपेत असतानाच अवघ्या काही तासांतच नववधूने  नवरदेवाच्या घरून धूम ठोकल्याची घटना वैजापूर तालुक्यातील मनूर येथे घडली. बायको गेली अन् पावणेदोन लाखही गेले. याप्रकरणी बनावट नववधूसह दलाल अशा पाच जणांच्या टोळीविरुध्द  शिऊर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







         अनिल दिंगबर जोशी (रा.जवळी ता.कन्नड), मनीषा गजानन मानवते (रा.खामगाव ता. खामगाव जि. बुलढाणा), पुजा विजय माने (रा.महाडीकवाडी लिंगीवरे जि. सांगली), रणजीत (पूर्ण नाव माहीत नाही रा.हिंगोली) व नंदिनी राजू गायकवाड (रा.राजीव गांधीनगर अकोट फईल जि.अकोला) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील पिडीत २९ वर्षीय लग्नाळू तरुण मागील बऱ्याच दिवसांपासून वधूच्या शोधात होता. दरम्यान नातलगातीलच एकाने 'लग्न जुळवून देणाऱ्या दलालाशी आपली ओळख आहे' असे सांगून पीडित तरुणाचा रणजीत नामक व्यक्तीशी संपर्क करून दिला. 


पावणेदोन लाख मोजले

रणजीतनेही तरुणाला 'योग्य वधू मिळेल परंतु एक लाख ८१ हजार रुपये लागतील' असे सांगितले. मग 'मरता क्या नही करता ?' म्हणून तरुणानेही लगेच होकार दिला. दलालानेही लगेचच नंदिनी गायकवाड या तरुणीशी पीडित तरुणाची भेट घातली. १० एप्रिल रोजी वैजापूर मनूर येथील एका मंदिरात तरुण व नंदिनी गायकवाड यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्न लागताच दलाल रणजीत याने एक लाख ८१ हजार रुपये घेतले व अन्य दलाल मंडळीसोबत तो तेथून निघून गेला. यानंतर तरुण नववधू व अन्य नातेवाईकांसह घरी परतला. रात्री तो घराच्या छतावर तर नववधू, तरुणाची मावशी व अन्य महिला नातलग घरात झोपी गेल्या. मध्यरात्री दोन वाजता घरात आरडाओरड सुरू झाला. 


दुचाकीवरून ठोकली धूम 

यावेळी तरुणाने घरात येऊन पाहिले असता नववधू घरात नसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने आजूबाजू चौकशी केली असता नंदिनी ही एका अनोळखी इसमाच्या मोटारीसायकलीवर बसून निघून गेल्याचे तरुणाला समजले. घडलेल्या प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याचे  त्याच्या लक्षात आले. अखेर गुरुवारी दुपारी तरुणाने शिऊर पोलिस ठाणे गाठत फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून बनावट नववधूसह दलालाच्या टोळक्यातील अन्य अशा पाच जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top