जिल्हाधिकाऱ्यांचे बैठकीत निर्देश
पेड न्यूज हा अत्यंत संवेदनशील विषय असून मीडिया सेंटर व माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीने या विषयावर बारकाईने लक्ष द्यावे, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
माध्यम संनियंत्रण व प्रमाणिकरण समिती तसेच एक खिडकी सुविधा समितीची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, अर्चना खेतमाळीस, व्यंकट राठोड, उपायुक्त अपर्णा थेटे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माध्यम संनियंत्रण समितीचे सदस्य आकाशवाणीचे वृत्त विभागप्रमुख समरजीत ठाकूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डॉ. दिनकर माने, मनपा चे जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, जिल्हा परिषदेचे संवाद तज्ज्ञ सतीश औरंगाबादकर, कैलास आहेर, सायबर पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार आदी उपस्थित होते. तसेच दुरदृष्यप्रणालीद्वारे तालुकास्तरीय नोडल अधिकारी सहभागी झाले होते.
आचारसंहिता कक्षाला कळवा
■ जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, पेडन्यूज बाबत संदिग्धता असण्याची शक्यता असते. अशावेळी अधिक बारकाईने व तपशिलात तपासणी करावी.
■ अशा बातम्यांची तात्काळ दखल घेतांनाच, आचारसंहिता भंगाच्या घटना, फेक न्यूज, चुकीची माहिती प्रसार करणे इ. बाबींवर लक्ष ठेवून असे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ आचारसंहिता कक्षाला कळवावे.
छाया स्त्रोत - गुगल