फोटो व्हायरल करण्याची स्पर्धा
सुर्य अक्षरशः आग ओकतोय.. परिणामी तापमानाने उच्चांक गाठलाय.. त्यातच लग्नतिथी दाट.. आगामी काळात सर्वच निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे आलेले निमंत्रण अन् विवाह सोहळ्यांसाठी हजेरी लावणे नेतेमंडळींना 'अनिवार्य' असल्यासारखी परिस्थिती आहे. अनेकांना तर लग्नसोहळे अटेंड केल्यामुळे आमदारकीचे 'दिवास्वप्न' पडू लागले आहेत. एकाच दिवशी असंख्य लग्न समारंभ 'कव्हर' त्या उपस्थितीचे छायाचित्र सोशल मीडियावर सायंकाळपर्यंत व्हायरल करण्याची जणू नेत्यांच्या अनुयायांमध्ये स्पर्धाच लागली आहे.
एप्रिल महिना अन् त्यात तप्त, रणरणत्या उन्हाने अंगाची काहिली होऊन घामाघूम होण्याची परिस्थिती आहे. वैजापूर शहरासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे. लोकसभा निवडणुकीचेही वातावरण तापायला सुरवात झाली आहे. एकंदरीत सर्वच 'उन्हाळी' वातावरण असले तरी 'लग्नाळू' तरुण - तरुणींसाठी ऐन या कोरड्या वातावरणात 'हिरवळी'चे दिवस म्हणावे लागतील. सध्या लग्नाचा हंगाम जोरात सुरू आहे. लग्न हा वैयक्तिक सोहळा असला तरी अलिकडच्या काळात त्याला सार्वजनिकतेचे स्वरूप येऊ लागले. लग्नातील बडेजावपणाचा दिखावा, जेवणावळी, डामडौल, सरबराई, डीजेचा दणदणाट, संगीत, वाद्यांच्या वेगवेगळ्या प्रकारामुळे लग्ने चर्चेत येऊ लागली.
सध्या शेतीलाच काय पण प्यायलाही पाणी नाही. परंतु लग्नातील हा डामडौल पाहून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. असं कुणी म्हणणार नाही. एरवी गप्पांचा फड रंगल्यानंतर पाणी, चारा, आटलेले विहिरींचे स्त्रोत, महागाई, गलिच्छ राजकारण आदी विषयांवर निराशेचा सूर काढऱ्यांना ही सणसणीत चपराक म्हणावी लागेल. परंतु थाटामाटात पार पडणारी लग्ने पाहता हा निराशेचा सूर का आळवला जातो? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मंत्री, नेतेमंडळींना लग्नात बोलावण्यासाठी लागलेली चढाओढ पाहता सर्वच 'आलबेल' आहे. असं वाटायला लागतं. परिणामी सध्यस्थितीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांचे 'शेड्युल' बिझी आहे. नेते, पदाधिकाऱ्यांचा तर भाव वधारलाच परंतु दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्तेही मागे नाही. गाड्याघोड्या 'खादी'चे 'अल्प'दरातील कपडे घेऊन अचानक झालेल्या या पुढाऱ्यांना सध्या 'सुगीचे' दिवस म्हणावे लागतील.
एरवी घरात, गल्लीत फारशी 'किंमत' नसली तरी या महाशयांचा बाहेर चांगलाच 'भाव' वधारला आहे. मंगलाष्टकांना नाही पोहचले तरी चालते. पण झकपक गाडीसह कार्यकर्त्यांच्या 'लवाजमा' घेऊन लग्नस्थळी जाऊन 'शान' मारूनच यायचीच. असा विडाच काहींनी उचलला आहे. एकाच दिवशी सात ते आठ लग्न उरकून घ्यायची जणू पुढाऱ्यांमध्ये 'अहमहमिका' लागल्याचे दिसत आहे. काहींच्या घोड्यामागून तर काहींच्या अगोदर 'वराती' निघू लागल्या. लग्न सोहळेच नव्हे तर दशक्रिया विधी, वास्तूशांती, मावंदे व घरगुती सोहळ्यांना हजेरी लावून नेते, पदाधिकारी 'चमकोगिरी' करीत आहेत. परिणामी बहुतांश जण हे आजच आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असल्याच्या 'अर्विभावात' आहे. नागरी समस्या सुटो अथवा न सुटो. परंतु घरगुती कार्यक्रमांना हजेरी लावणे हा एकच 'अजेंडा' नेत्यांनी हाती घेतला आहे.
काही ठिकाणी लग्नात तर वऱ्हाडी कमी नेत्यांचा लवाजमा जास्त अशी परिस्थिती आहे. त्यामुळे 'रात्र कमी अन् सोंगे फार अशी गत झाली आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीचीही धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे नेते, पदाधिकाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम करण्याची नामुष्की ओढवली आहे. लग्नसमारंभ आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावेही घेण्याची जबाबदारीही येऊन ठेपली आहे. एकंदरीत गोंधळाची परिस्थिती आहे. परंतु नेतेमंडळी आपापल्या पद्धतीने सगळ्याच 'आघाड्यांवर' योगदान देऊन कार्यक्रम 'साजरे' करून घेताहेत. त्यामुळे सोहळ्यांची कमाल अन् नेत्यांची धमाल.! असे म्हणावे लागेल.
छाया स्त्रोत - गुगल