Asaduddin Owaisi | इलेक्ट्राॅल बाॅंडची गरज काय? खुद्द मीच जेम्स बाँड; काय म्हणाले ओवैसी वाचा.!

0

 पंतप्रधानांसह राजकीय पक्षांवर टीका 



 

भाजपसह दोन्ही शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे सर्व एकच असून भाजपने मोठमोठ्या शेठ मंडळींकडून इलेक्ट्राॅल बाॅंडच्या नावाखाली सहा हजार कोटी रुपये घेतले. याशिवाय अन्य राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले असल्याचा घणाघात करू मला इलेक्ट्रॉल बाॅंडची गरज नाही. मी खुद्द जेम्स बाँड आहे. असा खोचक टोला एमआयएमचे सर्वेसर्वा तथा खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांनी वैजापूर येथे हाणला. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ शहरातील मुस्तफा पार्कमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.




लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत बोलताना एमआयएमचे प्रमुख खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी व्यासपीठावर खासदार इम्तियाज जलील व अन्य पदाधिकारी.


एम‌आय‌एमचे खासदार इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी,जिल्हाध्यक्ष समीर साजिद, युवा जिल्हाध्यक्ष मुन्शी पटेल, शहराध्यक्ष शारेख नक्शबंदी, प्रभाकर पारधे, ॲड.खिज़र पटेल, अय्यूब जहागीरदार, विकास एडके, तालुकाध्यक्ष अकील कुरेशी, शहराध्यक्ष वसीम खान, हाफीज शाहरुख, मुसा चाऊस, अजहर पटेल,शकील पटेल आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'लक्ष्य' करीत टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, इलेक्ट्राॅल बाॅंडचा घोटाळा देशात गाजतोय. इलेक्ट्राॅल बाॅंडच्या नावाखाली मोठमोठ्या शेठमंडळीकडून भाजपने सहा हजार कोटी रुपये घेऊन आपले हात काळे केले. यात फक्त भाजपच नव्हे तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांना पैसे मिळाले. 


सभेसाठी उपस्थित असलेले नागरिक


बाबरी मशिदीच्या प्रश्नावरही सर्वंच राजकीय पक्ष एकत्र झाले होते. हे विसरता येणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेल्वेस्थानकावर चहा विकली. आमचे काही म्हणणे नाही. ते म्हणतात मी केव्हाही झोळा घेऊन निघतो, मी एकटाच असून मला परिवार नाही. हरकत नाही. मग सहा हजार कोटी कशासाठी पाहिजे होते? असा प्रश्न उपस्थित करून 'हमाम में सब नंगे होते हैं' असा चिमटा घेऊन गरीबांना मोठी स्वप्ने दाखवून भाजपने देशाला अक्षरशः लुटले. सर्वच राजकीय पक्ष एकाच नाण्यांच्या बाजू आहेत. शेतकरी ,गरीब, कष्टकरी व मजुरांच्या मुद्द्यांचाही त्यांनी उहापोह केला.



'तिच' खैरेंची शेवटची निवडणूक 


शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकेची झोड उठवितांना ते म्हणाले की, खैरे आता भाषणातून 'ही माझी शेवटची असल्याची सांगतात'. परंतु २०१९ मध्ये झालेली निवडणूक त्यांची शेवटची होती. आता पुन्हा मतदार त्यांना संधी देणार नाहीत. २० वर्षें त्यांनी भावनिक राजकारण करून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सामान्यांच्या प्रश्नांसाठी संसदेत बोलताना ते  कधीही दिसले नाही. त्याउलट जलील सर्व समुदायासाठी नेहमीच अग्रेसर राहिले. विशेषतः कोरोना काळात ते घाटी रुग्णालयात सर्वांसाठी उपलब्ध होते. 



सहा पक्ष निवडणूक आखाड्यात 


एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसह शिवसेना, भाजप व काँग्रेस असे एकूण सहा पक्ष आखाड्यात उतरले आहेत. सहाच काय ६०० पक्षही मैदानात उतरले तरी जलील यांचा निवडणुकीत पराभव करणे अशक्यप्राय असल्याचे ओवैसींनी यावेळी म्हटले.



सर्वांनीच घेतला 'धसका'


छत्रपती संभाजीनगर येथील सभेत देशाचे गृहमंत्री अमित शाहांनी 'कमळ' फुलविण्याचे आवाहन केले होते. परंतु तशी परिस्थिती दिसत नाही. त्यांच्यासमोर उमेदवारी कुणाला द्यायची? हाच पेच आहे. भाजपनंतर आता शिवसेनेतून उमेदवाराचा शोध सुरू आहे. मी मराठा समाजासह धनगर, दलित व मुस्लिम समाजाचे प्रश्न हाताळले. त्यामुळे माझ्यासमोर खैरे असो अथवा आणखी कुणी? मला फरक पडत नाही. माझा सर्वांनीच धसका घेतला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top