दोघी जावांच्या वादात कुटुंबाची 'राख'
होळीच्या दिवशी वैजापूर ( जि. छत्रपती संभाजीनगर) तालुक्यातील अंचलगाव येथे एका कुटुंबाची अक्षरशः 'होळी'च झाली. घरगुती वादातून जावेने घरात पेट्रोल फेकले अन् पती, पत्नी व दोन चिमुकले होरपळले. या चौघांचाही एकापाठोपाठ काही दिवसांच्या अंतराने मृत्यू होऊन अख्खं कुटुंबच संपलं. दोघी जावांच्या क्षुल्लक वादामुळे दोन चिमुल्यांंनी तर जग पाहण्याअगोदरच इहलोकीचा निरोप घेतला. पाठोपाठ आईवडिलही गेले. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
मृत काव्या व कल्याणी |
वैजापूर तालुक्यातील अंचलगाव येथे हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. घरगुती वादातून जावेने घरात पेट्रोल फेकल्याने ते पणतीवर पडले अन् भडका होऊन पतीसह पत्नी व दोन चिमुकले असे चौघेजण होरपळल्याची घटना २४ मार्च रोजी घडली होती. या घटनेत पती अप्पासाहेब कोकाटे, पत्नी कोमल {२६ ), कल्याणी ( ५ वर्षे ) व काव्या ( ५ महिने ) या दोन मुलींचा एकापाठोपाठ मृत्यू झाला. काव्याचा घटनेच्या दिवशीच तर अन्य तिघांचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस नोंदीनुसार पाहता वाद क्षुल्लक होता. परंतु त्याचे पर्यवसान थेट अख्खं कुटुंबच संपण्यातच होईल. असं कुणालाही वाटलं नव्हतं.
मृत अप्पासाहेब कोकाटे |
तसे बघायला गेल्यास कौटुंबिक वाद कुठे नसतात? ते घरोघरी होतातच. कोमल हिच्या मृत्यूपूर्व जवाबानुसार नळाचे पाणी भरण्यावरून कोमल व तिची जाऊ कल्पना कोकाटे या दोघींमध्ये होळीच्या दिवशी वादाची 'ठिणगी' पडली अन् या ठिणगीने अख्ख्या कुटुंबाचीच 'होळी' होऊन त्यांचा बळी गेला. कल्पना हिने घरात पेट्रोल फेकले अन् या झालेल्या भडक्यात चौघेजण होरपळले. सुरवातीला या घटनेबाबत मतमतांतरे होती. कोमलच्या जवाबानंतर हे चित्र स्पष्ट झाले. तोपर्यंत पोलिस यंत्रणाही संभ्रमात होती. वाद होऊन घरात पेट्रोल फेकण्यापर्यंत जाणे म्हणजे हे टोकाचे पाऊल टाकले गेले. नातेवाईक असूनही एकमेकांबद्दल असलेला पराकोटीचा हा राग कुटुंब उद्ध्वस्त करून गेला. कोकाटे कुटुंबातील चौघेजण तर गेलेच. परंतु कल्पनाचीही रवानगी हर्सूल कारागृहात झाली आहे. कालौघात तिचे वेदना, दु:ख कमी होईल. परंतु गेलेले चौघेजण पुन्हा परत येणार नाही.
मृत कोमल कोकाटे |
सध्याचे स्मार्ट फोनचे युग असल्याचे बोलले जाते खरे. शहरे आणि गावेही स्मार्ट होत चालली. परंतु माणसं खरंच स्मार्ट झाली का? हा प्रश्न आजही पडतो. घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आलेत. परंतु कौटुंबिक वाद, हिंसाचार आजही सुरूच आहे. यातून एकमेकांच्या जिवावर उठण्यापर्यंत माणसं चालली. त्यामुळे स्मार्ट युगात क्रांती झाली असली तरी वैचारिक, सामाजिक क्रांती पाहिजे त्या प्रमाणात झाली नसल्याचे खेदाने म्हणावे लागते. शेवटी कौटुंबिक वाद, कलह कितीही असले तरी ते सामोपचाराने मिटले पाहिजे. एकमेकांच्या जिवावर उठणे. हा त्यावरचा पर्याय होऊ शकत नाही अथवा ते सोल्युशनही नाही.
विशेषतः ग्रामीण भागात आजही क्षुल्लक वादामुळे टोकाचे पाऊल उचलले जाते. परिणामी हे वाद कोर्ट कचेऱ्यापर्यंत पोहोचून याचा शेवट भयावह झाल्याच्या अनेक घटना आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आजही समुपदेशन, जनजागृतीची खऱ्या अर्थाने गरज आहे. स्मार्ट फोन, दूरदर्शन संचाच्या माध्यमातून समाजजागृतीचे धडे मिळत असले तरी ते कुठेतरी कमी पडताय असं एकंदरीत अशा घटनांवरून वाटते. अंचलगावची ही घटना तालुक्याच्या इतिहासातील पहिलीच अशी घटना असावी. न्यायालयात का खटल्याचा काय निकाल लागायचा तो लागेलच. परंतु या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
एकंदरीत रागावर कुठेतरी नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. कोणती गोष्ट किती जिव्हारी लावून घ्यायची अन् कसे व कोणत्या पद्धतीने रिअॅक्ट व्हायचे? याबाबत मंथन करण्याची आवश्यकता आहे अन्यथा क्षुल्लक वादातून कुटुंबाची 'राख' व्हायला वेळ लागत नाही. या अंचलगावच्या घटनेवरून सिद्ध झाले. 'क्षणिक राग अन् कुटुंब खाक' असेच काहीसे येथे घडले.त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे. ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे.