अंचलगाव जळीतकांड प्रकरण
दोन चिमुकल्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानंतर गंभीर भाजलेल्या आईनेही उपचारादरम्यान मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यामुळे मृतांची संख्या आता तीनवर पोहचली आहे. दरम्यान कोमलच्या मृत्यूपूर्व जवाबानंतर तिच्या जावेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु सासूसह भायाविरुध्दही गुन्हा दाखल करण्याच्माया गणीसाठी तिच्या नातेवाईकांनी थेट शिऊर पोलिस ठाण्यात मृतदेह नेऊन दोन तास ठिय्या दिला. ठाणेप्रमुखांनी पुढाकार घेऊन नातेवाईकांना समजावून सांगितल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह तेथून हलवित सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात केले.
|
वैजापूर तालुक्यातील अंचलगाव येथे कौटुंबिक वादातून अंगावर पेट्रोल फेकल्याने गंभीर भाजलेल्या कोमल कोकाटे हिचा मृतदेह नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून थेट शिऊर पोलिस ठाण्यात नेऊन सासू व भाया विरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी करून ठिय्या दिला. |
कोमल अप्पासाहेब कोकाटे (२६ रा. अंचलगाव ) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कौटुंबिक वादातून अंगावर फेकलेल्या पेट्रोलच्या भडक्याने एकाच कुटुंबातील चौघेजण भाजल्याची घटना होळीच्या दिवशी म्हणजेच २४ मार्च रोजी वैजापूर तालुक्यातील अंचलगाव येथे घडली होती. या घटनेत पती अप्पासाहेब आसाराम कोकाटे (३५),पत्नी कोमल अप्पासाहेब कोकाटे(२६) हे दांपत्य भाजून गंभीर जखमी झाले होते तर मुलगी कल्याणी कोकाटे (वय ५),काव्या कोकाटे (वय ५ महिने) या दोघींचाही होरपळून मृत्यू झाला होता. घटनेनंतर कोकाटे दांपत्यास उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कल्याणी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
|
मृत कोमल कोकाटे |
भाजलेल्या कोमलने उपचारादरम्यान शुध्दीवर आल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जवाबात जाऊबाई कल्पना सोमनाथ कोकाटे व माझा नळाचे पाणी भरण्यावरून वाद झाला होता. भांडणात तिने माझ्या माहेराकडील मंडळींबाबत अपशब्द वापरले. मी तिला माझ्या माहेराबद्दल काही बोलू नकोस. असे म्हणून घरात निघून आले. त्यानंतर तिनें रागाच्या भरात खिडकीतून पेट्रोल घरात फेकल्याने ते देव्हाऱ्यातील दिव्यावर पडून भडका झाल्याने घराला आग लागली. त्यामुळे मला वाचविण्यासाठी आलेल्या माझ्या पतीसह व दोन मुली होरपळल्या. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला तर पती भाजून गंभीर जखमी झाला. असे सांगितले. त्यानुसार कल्पना कोकाटे या तिच्या जावेविरुध्द गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. बुधवारी तिला न्यायालयासमोर हजर केले असता तिला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान कोमल हिच्यावर २४ मार्चपासून घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला अन् गेल्या आठ दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज अयशस्वी ठरली. तिच्या मृत्यूनंतर बुधवारी सकाळी या प्रकरणात सासू व भाया सोमनाथ कोकाटे यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई करावी. या मागणीसाठी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसह मृतदेह थेट शिऊर पोलिस नेऊन दोन तास ठिय्या दिला. सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांनी नातेवाईकांची म्हणणे ऐकून घेत घटनेच्या कायदेशीर बाबी, तपास आदींबाबत समजावून सांगितल्यानंतर कोमल हिच्यावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील अंचलगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.