ठेकेदाराचीही मिलीभगत
शेतकऱ्यांना विद्युतपंपासाठी नवीन वीजजोडणी न देताच ते काम केल्याचे दाखवून धुळफेक करणाऱ्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. या जोडण्या केलेल्या नसतानाही तसे अभिलेखे ( रेकार्ड) तयार करण्यात आले. या प्रकरणाचा पर्दाफाश होताच महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांनी तडकाफडकी तीन अभियंत्यांना निलंबित केले आहे. या निलंबनास्त्रामुळे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अभियंत्यांच्या मिलीभगतमध्ये संबधित ठेकेदारही सहभागी आहेत.
शेतकऱ्यांना कृषीपंपाची जोडणी न देता एचव्हीडीएस योजनेतून काम पूर्ण केल्याचे रेकॉर्ड तयार करणाऱ्या महावितरण कंपनीच्या तीन अभियंत्यांवर महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली निलंबनाची कारवाई केली आहे. सहायक अभियंता विरांग सोनवणे, कनिष्ठ अभियंता नितीन कुलकर्णी व देविदास कोतवाल असे निलंबित करण्यात आलेल्या अभियंत्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर येथील महावितरण कंपनीच्या उपविभाग क्रमांक एक कार्य क्षेत्रातील वैजापूर ग्रामीण एकमध्ये सहायक अभियंता विरांग सोनवणे तसेच तालुक्यातील नागमठाण उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता नितीन कुलकर्णी व महालगाव उपकेंद्राचे देविदास कोतवाल या तिघांनी एचव्हीडीएस योजनेत कृषीपंपांना वीज जोडणीच्या प्रतीक्षा करणाऱ्या भम्गाव, नागमठाण येथील शेतकऱ्यांना वीज जोडणीचे काम पूर्ण न करता अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून कागदोपत्री वीजजोडणी केल्याचा गैरप्रकार केला.
याबाबत एकाने महावितरण कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन केलेल्या तपासणीत शेतकऱ्यांना प्रत्यक्षात वीजजोडणी दिली नसल्याचा गलथान कारभार समोर आला. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनी तीन दोषी अभियंत्यांवर ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तपासणीत सत्य आले समोर
एचव्हीडीएस योजनेत भग्गावचे जयराम बाबूजी त्रिभुवन व अशोक रेवजी त्रिभुवन, नागमठाणचे उपकेंद्रातर्गंत असलेल्या भाऊसाहेब शेकू शिंदे, मीरा तान्हाजी शेळके, अण्णा मारोती ढोकणे, उत्तम निवृत्ती तांबे, बाबासाहेब चाबुकस्वार यांना वीजजोडणी न देताच कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे तपासणीत समोर आले.
तर अनेकांचे बिंग फुटेल
दरम्यान महावितरण कंपनीचा कारभार ढेपाळला असून तालुक्यात अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून बहुतांश ठिकाणी बोगस कामे व काही ठिकाणी कामे न करता शासनाला चुना लावल्याच्या नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. या कामांची चौकशी झाल्यास अनेकांचे बिंग फुटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वैजापूर तालुक्यात झालेल्या कामांची तपासणी व्हायला पाहिजे. अशी मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे.
संबधित अभियंत्यांनी शेतकऱ्यांच्या विद्युतपंपाची प्रत्यक्षात वीजजोडणी न करता कागदोपत्री कामे दाखवली. त्यामुळे तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसे आदेशही आमच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.
- दीपक पांडव, उपकार्यकारी अभियंता, वैजापूर
छायास्त्रोत - गुगल