गर्भवती पत्नीसह पती जखमी
छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा-केम्ब्रिज चौक मार्गे बाळापूरकडे जाताना भरधाव कार पत्र्यांच्या गोदामात घुसली. यात चालक पतीसह गर्भवती पत्नी गंभीर जखमी झाले. झाल्टा फाटा परिसरात २० मार्च रोजी दुपारी ही घटना घडली. चिकलठाणा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पती-पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श चव्हाण (२७) व त्याची पत्नी अश्विनी चव्हाण (२२, दोघे रा. बाळापूर) हे कामानिमित्त कारने ( एमएच २०, जीई ५२९६ ) शहरात आले होते, काम आटोपल्यावर ते बाळापूरकडे निघाले. चिकलठाणा-केम्ब्रिज चौक मार्गे जाताना चव्हाण यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार बाजूच्या कठड्यावर आदळून उलटली व रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पत्र्यांच्या गोदामात घुसली. त्यामुळे ते पत्रेही कोसळले आणि कारवर आदळले.
सोबतच लाकडी बल्ल्या, दगडेही कारवर पडली. यात आदर्श आणि त्याची पत्नी अश्विनी हे दोघेही जखमी झाले. तेथून गेलेल्या वीजेच्या ताराही या पत्र्यावर पडल्या. त्यामुळे मदतकार्यही करता येत नव्हते. दरम्यान, या भागात गस्तीवर असलेले उपनिरीक्षक सतीश पंडित, संजय खंडागळे हे घटनास्थळी गेले. त्यांनी लाकडाने तारा बाजूला केल्या. पत्रे बाजुला करून कारच्या काचा फोडून दांपत्याला बाहेर काढले. खासगी वाहनाने त्यांना तत्काळ मिनी घाटीत भरती केले. त्यांच्या उपचार सुरू आहेत,