वैजापूर बसस्थानकातील घटना
कोपरगावला जाणाऱ्या बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून २ लाख रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना ११ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास वैजापूर शहरातील नवीन बसस्थानकात घडली. महिला नातलगाच्या लग्नासाठी हे पैसे घेऊन जात असताना भामट्यांनी हा डाव साधला. त्यामुळे पोलिसांची तपासणी होईपर्यंत बस स्थानकातच थांबविण्यात आल्याने अन्य प्रवासी ताटकळले होते. दरम्यान बसस्थानकातून यापूर्वीही अनेकदा रोकड तसेच सोन्याचे दागिने चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यातील एकाही घटनेचा शोध पोलिसांना घेता आलेला नाही.
वैजापूर शहरातील पाटील गल्लीतील परवीन शकील शेख यांच्या कोपरगाव येथील एका नातेवाइकांचे लग्न होते. लग्नासाठी परवीन शेख यांनी सोमवारी दुपारी शहरातील एका पतसंस्थेतून २ लाख रुपयांची रोकड काढून आणली होती. रक्कम काढल्यानंतर त्या घरी गेल्या. ही रक्कम नातेवाईकांना द्यावयाची असल्यामुळे त्या कोपरगावला जाण्यासाठी सायंकाळच्या सुमारास दोन लाख रुपयांची रक्कम घेऊन बसस्थानकावर गेल्या. ही रक्कम त्यांनी एका पर्समध्ये ठेवली होती.
थोड्यावेळाने कोपरगावला जाणारी बस (एम.एच. १४ बी.टी.३४३९ ) फलाटावर येताच बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधून २ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले. बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केली. त्यामुळे चालकाने बस फलाटावर थांबवून ही माहिती वैजापूर पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिसांनी स्थानकावर जाऊन बसमधील प्रवाशांची 'झाडाझडती' घेतली. परंतु रक्कम सापडली नाही. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.