शिवना नदीच्या पुलावरील घटना
आयशर टेंपोने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नागपूर - मुंबई महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील लासूरगावजवळ शिवना नदीच्या पुलावर घडली. निसार उर्फ बबलू कुरेशी (वय ४० रा. लासूरगाव) असे या अपघातातील मृताचे नाव आहे.
मृत निसार कुरेशी |
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास निसार कुरेशी हे दुचाकीवरून (क्रमांक एमएच २० एफएन १७७९) लासूरगावकडे जात होते. त्यावेळी वैजापूरच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेंपोने (क्रमांक एमएच ४० बीजी ०७४४) दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात कुरेशी यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने लासूरस्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांंना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनेतील टेंपो ताब्यात घेतला आहे.