वाळूची तीन वाहने पकडली
वैजापूर तालुक्यातील गोदापात्रात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाळूची चोरटी वाहतूक करणारी तीन वाहने पकडण्यात आली. यातील दोन वाहने तहसीलदार व अन्य एक वाहन पोलिसांनी पकडले. दरम्यान तहसीलदारांनी पुन्हा एकदा खबऱ्यांना चकवा देत दुचाकी 'पॅटर्न' वापरून माफियांच्या उरात धडकी भरवली आहे. आहे.
वैजापूर तालुक्यातील गोदावरी पात्रात ट्रॅक्टरद्वारे अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच तहसीलदार सुनील सावंत यांनी विरुद्ध दिशेने तर महसूल पथक दुसर्या दिशेने गोदापत्राकडे पाठविले. तहसीलदारांनी खबऱ्यांना चकवा देत तालुक्यातील नागमठाण येथील मयूर गुंजाळ व डाकपिंपळगाव येथील फकिरा निंबाळकर यांचे ट्रॅक्टर पकडून प्रत्येकी एक ब्रास वाळू जप्त केली. तहसीलदार सावंत यांनी पुन्हा एकदा दुचाकी पॅटर्न यशस्वी करत एकाच दिवशी दोन वाहने पकडून माफियांच्या मुसक्या आवळल्या आहे.
दरम्यान तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी विक्रम वरपे, अक्षय सव्वालाखे, वासुंदेकर, कोतवाल तुपे यांनी ही कारवाई केली. निवडणूक कामात अधिकारी व्यस्त असल्याची संधी साधून वाळू उपसा करण्याचा डाव माफियांच्या अंगलट आला. या कारवाईमुळे माफियांचे धाबे दणाणले आहेत.
बाभुळगावगंगातही पकडले वाहन
दरम्यान तालुक्यातील बाभूळगावगंगा शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई करून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अविनाश दगडू फुलकर (रा. निमगाव खैरी ता. श्रीरामपूर ) याच्याविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बाभूळगावगंगा शिवारात वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलीसांना खबऱ्यामार्फत मिळाली.
ही माहिती मिळताच बुधवारी रात्री पोलीसांनी सापळा रचून सव्वादहा वाजेच्या सुमारास बाभुळगावगंगा येथे वाहन अडवून चालकाला वाहनातील वाळूबाबत चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तीन ब्रास वाळू व विना क्रमांकाचा टेंपो असा १ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस उपनिरीक्षक दीपक औटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीरगाव पोलिसांत वाळू चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.