दुचाकी 'पॅटर्न' यशस्वी
वैजापूर तालुक्यातील वेगवेगळ्या भागात वाळूची चोरटी वाहतूक करणारी चार वाहने तहसीलदार सुनील सावंत यांच्यासह पथकाने पकडून जप्त केली आहे . २० मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान तहसीलदारांनी पुन्हा एकदा 'दुचाकी पटर्न' राबवत मोटारसायकलने जाऊन वाळू तस्करांना चकवा देत ही कारवाई केली.
वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांनी अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारी वाहने पकडली. |
याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याची संधी साधून तालुक्याच्या हद्दीतील नदी पात्रात वाळू तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत. दरम्यान शिवना नदी पात्रातून टिप्परने (एमएच २० १२२९) वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार सुनील सावंत यांना खबऱ्यामार्फत मिळाली. माहिती मिळताच पहाटेच्या सुमारास त्यांनी शिऊर येथे जाऊन वाहन अडविले. यावेळी चालकाला त्यांनी नाव - गाव व वाहनातील वाळूच्या रॉयल्टीबाबत विचारणा केली असता नाव बंटी एरंडे व मालकाचे नाव गोकुळ सुर्यवंशी असल्याचे सांगत रॉयल्टीची कोणतीही कागदपत्रे नसल्याचे सांगितले.
याशिवाय तालुक्यातील जांबरगाव येथेही वाळूची वाहतूक करणारा टिप्पर (एमएच २० बीजी ७९३६) सावंत यांनी अडविला. चालकाने त्याचे नाव सचिन चौधरी व मालकाचे नाव आप्पासाहेब साळूंके असे असल्याचे सांगत आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे तहसीलदार यांनी कारवाई दरम्यान दुचाकी पॅटर्न राबवत मोटारसायकलने माहितीतील ठिकाण गाठले.
बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तहसीलदार यांच्या पथकाने लाडगाव येथे दादासाहेब साहेबराव शिंदे (रा.नांदूरढोक) तर पुरणगाव येथे महेश विष्णू गायकवाड (रा.खोपडी ता.गंगापूर) या दोघांना अवैध वाळू वाहतूक करताना पकडले. जप्त केलेली वाहने पुढील कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आली आहे. सदरची कारवाई तहसीलदार सुनील सावंत यांच्यासह तलाठी विक्रम वरपे, अक्षय सव्वालाखे, गोमलाडू, मेजर रक्ताटे, वासुंदेकर यांच्या पथकाने केली.