सुराळा येथील घटना
तरुणीने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना २१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील सुराळा येथे उघडकीस आली. अरबिया समीर पठाण (१८) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अरबिया ही सुराळा येथे कुटुंबियांसह रहिवासास होती. नुकतेच तिने बारावीची परीक्षा दिली होती. दरम्यान बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबातील सर्व सदस्य जेवण आटोपून झोपी गेले. पहाटे अरबिया घरात दिसून आली नाही त्यामुळे कुटुंबियांनी तिचा परिसरात शोध घेतला. गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गावातीलच शेतकरी संजय रोठे यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला. याबाबत त्यांनी पोलिसांना कळविले. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला असता मृतक अरबियाचाच असल्याची नातलगांना खात्री पटली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार संतोष सोनवणे करीत आहेत.