Anti Corruption Department | 'तो' लाच घेताना अलगद अडकला पोलिसांच्या जाळ्यात; इंजिनिअरही सहभागी

0

 देयक काढण्यासाठी घेतले पैसे 



 

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या गायगोठ्याचे देयक काढण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वैजापूर तालुक्यातील संवदगाव येथील रोजगारसेवकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ०८ मार्च रोजी सकाळच्या सुमारास पथकाने तालुक्यातील सवंदगाव येथे ही कारवाई केली. दरम्यान पंचयात समितीतीच्या मराग्रारोहयो विभागातील अभियंता वैभव गुडदे याच्या सांगण्यावरून आपण लाच स्वीकारल्याचे रोजगार सेवकाने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

   






 अभियंता  वैभव रावसाहेब गुडदे (रा.वक्ती पानवी) व रोजगार सेवक जितेंद्र कोंडाजी कदम (रा.सवंदगाव)असे या दोघा लाचखोरांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सवंदगाव येथील शेतकऱ्यास महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गंत गायगोठा मंजूर झाला आहे. या गोठ्यासाठी त्यांना १ लाख २२ हजार रुपये मंजूर झाले आहे. गायगोठयाचे बहुतांश काम झाल्याने काही प्रमाणात देयक निघणार होते. पंचायत समितीचा अभियंता वैभव गुडदे व रोजगारसेवक जितेंद्र कदम या दोघांनी शेतात जाऊन गोठ्याची पाहणी केली. परंतु देयक काढण्यासाठी त्या दोघांनी शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.



 तडजोडीअंती ८ हजार रुपये देण्याचे शेतकऱ्याने मान्य केले. त्यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. त्याआधारे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पथकाने सापळा रचून रोजगारसेवक जितेंद्र कदम याला आठ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही रक्कम अभियंता वैभव गुडदे याच्या सांगण्यावरून स्वीकारत असल्याची कबूल त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक दीपाली निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top