वैजापूर येथे आढावा बैठक
लोकसभा निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे कामे गांभीर्याने घ्या. दिरंगाई व चालढकलपणा करू नका. 'चुकले तर ठोकलेच' अशा कडक व शेलक्या शब्दांत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली.
वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सोबत प्रभोदय मुळे, अरुण जऱ्हाड, सुनील सावंत, महक स्वामी |
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील विनायक पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, निवडणूक काळात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे, मोबाईल कायम चालू ठेवणे, बैठका व कार्यशाळेत वेळेवर हजर राहणे आदी बाबी बंधनकारक आहे.
निवडणूक कामकाज पार पडताना कायदा व आपल्या कर्तव्याबाबत अभ्यास करून कामकाज करावे. संबंधित कर्मचा-यांच्या परीक्षा घेऊन टाळाटाळ करणाऱ्या कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. या काळात अससक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या, कर्तव्यात कसूरता व कामात अनियमितता करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. याशिवाय बैठकीला गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांविरुध्द निवडणूक अधिनियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमातर्गंत रांगोळी व चित्रकला स्पर्धांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रम राबवावेत. तसेच सर्व संघटनाच्या बैठका घेऊन, प्रभातफेरी, बॅनर लावून मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. मतदान केंद्रावरील सुविधेवर प्रशासन विशेष लक्ष देणार असून सर्व कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली जाणार आहे. मेडिकल किट, मानधन जेवण, पाणी आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.
बैठकीस उपस्थित अधिकारी व कर्मचारी |
मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सहायता कक्ष, दिव्यांग कक्ष, पाळणाघर आदी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही प्रक्रिया राबवित नोडल अधिकाऱ्यांनी यांनी अभ्यास करून कामकाज करावे. अन्यथा रविवारी संबंधिताची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तहसीलदार सुनील सावंत यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्वतयारीचे सादरीकरण करून प्रास्ताविक केले. बैठकीस गटविकास अधिकारी सुहास वाघचौरे, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव, नायब तहसीलदार संतोष इथापे, रमेश भालेराव, मुख्याधिकारी अधिकारी भागवत बिघोत, पारस पेटारे, दिलीप त्रिभुवन, दीपक त्रिभुवन, संतोष जाधव, सचिन गायकवाड, अमेय पवार, राजू कीर्तने आदी उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्था राखा
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत सतर्क राहवे. अशा सूचनाही पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. याशिवाय तडीपार प्रकरणेही लवकर निकाली काढण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.