महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा
एका अल्पवयीन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान केवळ पाच हजार रुपयांसाठी अल्पवयीन मुलीला शहरातील एका महिलेने त्या नराधमाच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याने मुलीला कारमध्ये नेऊन लाॅजमध्ये अत्याचार केला. याप्रकरणी महिलेविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित चव्हाण ( रा.मुंबई ) याच्यासह वैजापूर येथील एका महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील पीडित सोळा वर्षीय मुलगी ही कुटुंबीयांसह वैजापूर शहरात रहिवासास आहे. दरम्यान शहरातील एका महिलेचे पीडित मुलीच्या घरासमोर असलेल्या भाडेकरूकडे येणेजाणे होते. यातून मुलीची व तिची ओळख झाली. ०९ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पीडीता घरी असताना ती महिला तिथे आली व तिला सोबत घेऊन गेली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध सुरू केला. परंतु ती मिळून आली नाही.
अखेर मुलीच्या आईने त्या महिलेला गाठून मुलीबाबत विचारणा केली. यावेळी ती गोंधळून गेली. परंतु पीडितेच्या आईने 'मुलगी कुठे आहे ? खरं-खरं सांग.' असे म्हटल्याने 'तुमच्या मुलीला मी गंगापूर चौफुलीवर घेऊन गेले होते. त्या ठिकाणी माझ्या ओळखीतील मुंबई येथील रोहित चव्हाण याचा मला फोन आला. मी मुलीला त्याच्यासोबत त्याच्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून दिले होते. त्याने मला पाच हजार रुपये दिले व एका तासात मुलीला आणून सोडतो. असे सांगितले होते. परंतु बराच वेळ झाला रोहित चव्हाण हा मुलीला घेऊन गंगापूर चौफुलीवर आला नाही त्यामुळे मी माझ्या घरी निघून गेले' असे सांगितले.
अखेर १० मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नराधमाने मुलीला कारने गंगापूर चौफुलीवर आणून सोडले व मुलीने आपले घर गाठले. 'त्या महिलेने एका इसमाकडून ५ हजार रुपये घेऊन मला त्याच्या कारमध्ये बसवून दिले. त्याने मला एका लॉजवर नेऊन ०९ मार्चच्या सायंकाळी पाच वाजेपासून ते १० मार्चच्या सकाळी ११ वाजेपर्यंत इच्छेविरुद्ध अत्याचार केला' असे आईला सांगितले. लगेचच पीडित मुलीच्या आईने वैजापूर पोलिस ठाणे गाठून घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी रोहित चव्हाण याच्यावर बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय महिलेविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.