उपस्थित बुडाले हास्यकल्लोळात
विजय गायकवाड | सत्यार्थी
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची बोलण्याची बेरकी शैली अख्ख्या राज्यात सर्वश्रुत आहे. ते केव्हा काय बोलतील याचा नेम नाही. बोलण्यात अस्सल ग्रामीण बाज असल्यामुळे ते ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्यातील वाटतात. ते स्वतः ग्रामीण भागातून आलेले असल्यामुळे त्यांना सर्व बारकावे माहीत आहे. काल झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सालगड्यापासून ते दोन दाती बैल, गाय, बकरी, एकरी पेरण्यासाठी किती बियाणे लागते. हे सर्व विषय सहजतेने हाताळून एका शेतकऱ्याची त्यांनी बोलतील बंद केली. त्यांचे अख्खे भाषण शेती, घर, कुटुंब व विठ्ठलरावांभोवतीच केंद्रीत राहिल्याने उपस्थितांचे पोट धरून हसून - हसून बेहाल झाले.
झाले असे की, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते तालुक्यातील पुरणगाव येथील गोदापात्रातील पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. भाषणाच्या सुरवातीला त्यांनी मंडप मालकाची फिरकी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना कशा राबविल्या. रासायनिक खतांच्या किंमती जास्त असतानाही शासन कंपन्यांना अनुदान देऊन शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते उपलब्ध करून देते. याशिवाय काॅंग्रेस राजवटीत शेतकऱ्यांना पीकविमा माहीत नव्हता. शेजारच्या पाकिस्तानात काय स्थिती आहे? याबाबत असे भरभरून बोलत होते. भाषण सुरू असतानाच शेतकरी विठ्ठलराव तुरकणे यांनी कांद्याला भाव नसल्याची ओरड केली. मग गप्प बसतील ते दानवे कसले? त्यांनी पाठोपाठ सरबत्ती करून विठ्ठलरावांना सळो की पळो करून सोडले. दानवे शेवटपर्यंत विठ्ठलरावांभोवतीच बोलून घिरट्या घालत होते. मी शेतकरी असून मला शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टींची माहिती आहे. शेती हा परवडणार विषय नाही. हे अगोदरच दानवेंनी मान्य करून 'पेरण्यासाठी एकरी किती तीळ लागते? प्रश्न त्यांनी विठ्ठलरावांना विचारून क्लिनबोल्ड केले. या प्रश्नावर विठ्ठलराव काहीच न बोलल्याने दानवेंनी 'तुम्ही फक्त कागदोपत्री शेतकरी दिसता' असा चौकार ठोकला. नंतर गव्हाचे भाव विचारले असता तेही त्यांना सांगता आले नाही. या सर्व बाबींचा खुलासा दस्तुरखुद्द दानवेंनीच केला. त्यांचे भाषण संपेपर्यंत विठ्ठलरावांच्या नावाचाच बोलबाला सुरू होता. दानवेंच्या या चौकार - षटकारांमुळे उपस्थितांमध्ये हास्यकारंजे उडत होते. भर उन्हात कार्यक्रम सुरू असतानाही दानवेंच्या विनोदी भाषणामुळे उनही सुसह्य झाले. जातांना विठ्ठलराव तुरकणे यांनी दानवेंची भेट घेऊन सोबत छबी टिपून घेतली. दानवेंच्या अख्ख्या भाषणात केंद्रस्थानी राहील्याने विठ्ठलरावांची छाती फुगून गेली.
मी रोटेगावला येऊन पाहतोच
आमदार बोरनारेंसह डॉ. दिनेश परदेशी यांच्यासह अन्य काही वक्त्यांनी वंदे मातरम् ट्रेनसह अन्य ट्रेनला रोटेगावला थांबा देण्याचा उल्लेख भाषणातून केला. दानवेंनी हाच धागा पकडून जोरदार फटकेबाजी केली. थांबा द्यायचा असेल तर तेथून रेल्वेला किमान १२५०० रुपयांचा महसूल मिळायला हवा. रोटेगावला एक उतरायचा आणि एक बसायचा. असे झाले तर कसा खेळ जमेल. प्रत्येकाच्या घरात गाड्या झाल्या. कुणीही ट्रेनने जायला तयार नाही. मी थांबा द्यायला तयार आहे. नंतर मी रोटेगावला येऊन बघतो, ट्रेनमध्ये कोण -कोण बसतात ते. कुठेही ट्रेन थांबविण्यात काय मजा आहे असे सांगून 'विठ्ठलराव , तुम्हाला अशा ट्रेनमध्ये बसवायला पाहिजे' असे म्हणत पुन्हा त्यांना दणका दिला अन् पुन्हा एकदा हास्यकल्लोळ झाला.
आ. बोरनारे आणि बाळंतपण
दानवेंनी केवळ विठ्ठलरावांचीच फिरकी घेतली नाहीतर शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनाही सोडले नाही. सराला बेटाचा विषय भाषणातून ओघाने निघाल्यानंतर बोरनारेंकडे तिरका कटाक्ष टाकून 'यांच्यामुळे' मी बेटावर येत नाही. अशी कोपरखळी हाणली. त्यानंतर निवडणूक लढविल्याच्या अनुषंगाने पुन्हा बोरनारेंकडे बघून 'तुमचं हे पहिलेच बाळंतपण आहे, माझे मात्र २६ बाळंतपण झाले आहे. तरीही 'पठ्ठ्या' दिसतो कसा? असा प्रश्न विचारल्यानंतर उपस्थितांकडून भरभरून टाळ्या पडल्या.
काका, तुम्ही गरीब कसे?
दानवेंनी भाषणातून गरीब आणि श्रीमंत कोण आहेत? असे दोन वेगवेगळे प्रश्न विचारले असता पहिल्या प्रश्नावर सर्वांचेच हात वर झाले. परंतु श्रीमंत कोण - कोण आहेत? या प्रश्नावर मात्र कुणीच हात वर करेनात. त्यामुळे दानवेंनी मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाऊसाहेब ठोंबरे यांच्याकडे वळवून 'काका, मी आताच तुमच्या शेतात जेवायला आलो होतो, तेव्हा मला १५ गाड्या दिसल्या. त्यामुळे तुम्ही गरीब कसे? किमान तुम्ही तरी हात वर करायला पाहिजे होता. त्यांच्या या शालजोडीवर उपस्थितांना हसू आवरेना.!